खासदार विशाल दादांची पहिली वर्षपूर्ती " फेल...."
वर्षभरात मिरजेच्या पदरी निराशाच...
मिरजेसाठी विशालदादांचे मन कधी "विशाल" होणार...?
◆ मिरज रेल्वे जंक्शन, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता विषय "जैसे थेच..."
◆महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील महत्वाचे मिरज रेल्वे जंक्शन हे केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. मात्र, केंद्रात सत्त्ता असलेल्या भाजप खासदार संजयकाका पाटील यांचे मिरज रेल्वे जंक्शनकडे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याने मिरज जंक्शन तब्बल दहा वर्षे विकासापासून वंचित राहिला.
◆तसेच, मिरज शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे येतो. या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली होती की, या रस्त्यामुळे अनेकांना जीवा मुकावे लागले तर, अनेकांना कायमचे अपंगत्व आले.
◆ इतकी भयानक दुरावस्था या रस्त्याची झाली असतानाही केंद्रात सत्तेत असलेल्या तत्कालीन भाजप खासदार संजयकाका पाटील यांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले.
◆ त्यामुळे अखेर मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने मिरजकर जनता पेटून उठल्याने २०२१ साली छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाचा नारळ फुटला. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे गेल्या चार वर्षात या रस्त्याचे काम पुर्णत्वास जाताना काही दिसत नाही आहे. वास्तविक केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या मिरज रेल्वे जंक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्ताबाबत भाजप खासदार संजयकाकांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या कार्यपध्दतीबाबत मिरजकरांमध्ये प्रचंड नाराजी होती. ही नाराजी मिरजेतून विशालदादांना उत्स्फुर्तपणे झालेल्या मतदानातून दिसून आली. त्यामुळे खासदार विशालदादांना जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमाकाचे मताधिक्य मिरजेतून मिळाले, ही वस्तुस्थिती आहे.
◆ इंग्लिश आणि हिंदीवर चांगले प्रभुत्व असणारा, विषयाची मांडणी करण्यात पटाईत असलेल्या खासदार विशालदादांकडून मिरजकरांच्या अपेक्षा निश्चित वाढल्या. मिरज रेल्वे जंक्शन विकासाला चालना मिळेल तसेच, गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामााला गती मिळेल, अशी आशा मिरजकरांना आहे.
◆ मात्र, खासदार विशालदादांच्या विजयाची वर्षपूर्ती म्हणजे आज 4 जून 2024 रोजी मिरजकर-सांगलीकर जनतेने "विशाल" विजय देत "विशाल" यांना खासदार केले होते. गेल्या वर्षभरात खासदार विशालदादांनी विविध राष्ट्रीय स्तरावरील विषयांवर लोकसभा गाजवली. मात्र, सांगली लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न जसेच्या तसेच आहेत.
◆ विशेषतः मिरज रेल्वे जंक्शनचे "मॉडर्न स्टेशन" बाबत काहीच ठोस पाठपुरावा खासदार विशाल पाटील यांच्या कडून झाल्याचे दिसत नाही.? किमान मिरज जंक्शन विकासासाठी रेल्वे विभागाची स्वतंत्र बैठक घेतल्याचे ना वाचण्यात आले, ना ऐकण्यात आले. उलट, गरज नसताना मिरजेतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या सांगलीतून सोडण्याचा व थांबविण्याचा खासदारांचा अट्टाहास पाहता मिरज रेल्वे जंक्शनचे महत्वच कमी करण्याचे षडयंत्र सुरू आहे का? असे सर्वसामान्य मिरजकरांना वाटू लागले आहे.
◆ शिवाय, मिरज सुधार समितीच्या रेट्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात ६ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक झाली.
◆ बैठकीत रस्ता पुर्णत्वास जाण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. मात्र, बैठकीत झालेल्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी आजतागायत झाली तर नाही, शिवाय गेल्या सात महिन्यांत या रस्त्यावरील एक दगडही हलला नाही. उलट, अर्धवट कामामुळे बसविण्यात आलेल्या पथदिवे अपघात होऊन ढासळत आहेत.
◆ मिरज रेल्वे जंक्शन विकास आणि अंदाजपत्रकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पुर्णत्वास नेणे या दोनच मागण्या आम्हा मिरजकरांच्या खासदारांकडून आहेत. मात्र, खासदार विशालदादा यांची पहिली वर्षपूर्ती आम्हा मिरजकरांसाठी "फेल"च गेली असं म्हणावं लागेल....
आपल्या हक्काची... मिरज सुधार समिती 🙏🤝✊