yuva MAharashtra मैनुद्दीन बागवानांच्या विरोधातील याचिकेची पुढील तारीख १० एप्रिल रोजी

मैनुद्दीन बागवानांच्या विरोधातील याचिकेची पुढील तारीख १० एप्रिल रोजी

 


मैनुद्दीन बागवानांच्या विरोधातील याचिकेची पुढील तारीख १० एप्रिल रोजी  

पत्नीच्या नांवे थकित घरपट्टी आणि तिसरे अपत्याबाबत याचिकाकर्त्यांनी केली आहे तक्रार

--------------------------------------------------------------------------

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची पुढील तारीख १० एप्रिल रोजी निश्चित केली आहे.  मिरज सुधार समितीच्या सौ. अरिफा काझी आणि एमआयएम पक्षाच्या सौ. शाहीस्ता पिरजादे यांनी सांगली जिल्हा न्यायालयात महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ६ ड गटातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेद्वार मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. मैनुद्दीन बागवान यांना तिसरे अपत्य असल्याचे तसेच, बागवान यांच्या पत्नीच्या नांवे थकित घरपट्टी असूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी  मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अपात्र केले नसल्याची तक्रार याचिकामध्ये केली आहे. 

यंदाची सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणूक उमेद्वारी छाननी वेळी प्रभाग क्र. ६ ड गटातील  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेद्वार मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात दोन हरकती दाखल झाल्या होत्या. त्यातील महापालिकेचे वाहन भाडे संदर्भात हरकतीवर सुनावणी झाली. मात्र, बागवान यांच्या पत्नी सौ. कौसर मैनुद्दीन बागवान यांच्या नांवे असलेल्या मिळकतीचे घरपट्टी थकित असल्याबाबत हरकत घेण्यात आली होती. नंतर हरकत मागे घेण्यात आली. मात्र, सदर हरकतीवर निवडणूक निर्णय  अधिकाऱ्यांनी  स्वतंत्रपणे सुनावणी घेणे आवश्यक असताना, सुनावणी न घेता बागवान यांचा अर्ज पात्र ठरवला. तसेच, मैनुद्दीन बागवान यांना तिसरे अपत्य असून सदर अपत्याबाबत बागवान यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रात व प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याची तक्रार मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ. अरिफा काझी आणि प्रभाग क्र. ६ अ गटातील एमआयएम पक्षाच्या उमेद्वार सौ. शाहिस्ता पिरजादे यांनी अ‍ॅड. ए. ए. काझी यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात दोन वेगवेगळ्या दाखल केलेल्या याचिकेत केले आहे. 

शुक्रवारी सदर दोन्ही याचिका जिल्हा न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले असता, महापालिका आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने अ‍ॅड. रियाज जमादार आणि   मैनुद्दीन बागवान यांच्या वतीने अ‍ॅड. सुहास शेठ यांनी वकिलपत्र दाखल केले आहे. याचिकेची पुढील तारीख १० एप्रिल निश्चित केली आहे.