🛑 नगरसेविका शिरिनबानू पिरजादे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची सखोल फेरतपासणी करा
🛑 मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी यांची मागणी
🛑 दक्षता पथकाच्या चौकशीतील त्रुटी, परस्परविरोधी नोंदी
🛑 मुजावर/खादीम पदाच्या दाव्याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक
---------------------------------------------
शहरातील प्रभाग क्र. 5 मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प. गट) नगरसेविका शिरिनबानू हयातचांद पिरजादे यांच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात उपलब्ध कागदपत्रांमध्ये आढळणाऱ्या विसंगती, वंशावळ व महसुली अभिलेखांतील विरोधाभास, दक्षता पथकाच्या चौकशी अहवालातील कथित त्रुटी तसेच मुजावर/खादीम पदाच्या दाव्याच्या सत्यतेबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, शिरिनबानू हयातचांद पिरजादे यांना इस्लामपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी जात प्रमाणपत्र दिल्याची नोंद आहे. दुसरीकडे, त्यांच्या भावाला मिरज येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी जात प्रमाणपत्र दिलं आहे. मात्र, त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात नोंदी कार्यालयात उपलब्ध नसल्याचे निष्कर्ष जिल्हा जात पडताळणी समितीने निकालपत्रात स्पष्ट केले आहे.
कागदपत्रांतील नोंदी, वंशावळ, पूर्वजांचे जन्मस्थान, वास्तव्य आणि संबंधित महसुली अभिलेख यांची परस्पर तुलना करून वस्तुनिष्ठ पडताळणी होणे आवश्यक आहे. विशेषतः जात प्रमाणपत्र देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने कोणत्या कायदेशीर तरतुदी व पुराव्यांच्या आधारे प्रमाणपत्र दिले, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
दक्षता पथकाच्या चौकशीवरही प्रश्नचिन्ह...
दक्षता पथकाने सादर केलेल्या अहवालातील काही बाबी आणि संबंधित साक्षीदारांच्या जबाबांविषयी तक्रारी व आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे दक्षता पथकाच्या अहवाला विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. म्हणून, प्रत्यक्ष स्थळपडताळणी, संबंधित व्यक्तींचे जबाब, ग्रामपंचायत व महसुली अभिलेख तसेच ट्रस्ट आणि वक्फ मंडळाकडील कागदपत्रांची योग्य तपासणी झाली होती का..? याची स्वतंत्र फेरतपासणी करावी, तसेच, संबंधित साक्षीदारांना समितीसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगून त्यांचे जबाब नोंदवावेत. तसेच, मुजावर/खादीम पदाच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ सादर केलेल्या कागदपत्रांची मूळ अभिलेखांशी पडताळणी करण्यात यावी, अशीही मागणी आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेरतपासणीबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ऍड. ए. ए. काझी यांनी सांगितले.
