yuva MAharashtra छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम रुंदीकरणासह होणार - खासदार विशाल पाटील यांनी घेतली प्रशासन आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक

छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम रुंदीकरणासह होणार - खासदार विशाल पाटील यांनी घेतली प्रशासन आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक


छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम रुंदीकरणासह होणार - खासदार विशाल पाटील यांनी घेतली प्रशासन आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक - गटारी, दुभाजक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

मिरज | प्रतिनिधी 

मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह पूर्ण करण्याचा तसेच, रस्त्याच्या दुतर्फा गटारी आणि रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आदी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशालदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंडरकर, सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी,कामाचे ठेकेदार निर्माण कन्स्ट्रक्शनचे अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  बैठक झाली. 

बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बस स्थानक, महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटविणे, 22 मीटर रस्ता रुंदीकरणसाठी खासगी मिळकतधारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच  रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यामधील दुभाजक (डीवायडर) आदी कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालया पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले चौक असे रस्त्याच्या दुतर्फा गटारी करण्यात येणार आहेत. 

बैठकीस माजी नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, अय्याज नायकवडी, मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, कार्यवाह जहिर मुजावर, उपाध्यक्ष नरेश सातपुते, सलीम खतीब, वसीम सय्यद, धनराज सातपुते यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, एस. टी. महामंडळ, भूमी अभिलेख कार्यालय, एमएसईबी आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.