🟣 मिरज- सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गठीत
🟣 आमदार सदाभाऊ खोत यांच्या लक्षवेधीवर राज्य सरकारची घोषणा
🟣 मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश
🟣 सुस्थितीत रस्त्यावर होतोय २९ कोटी निधीचा चुराडा
______________________________________
मिरज-सांगली रस्ता हा ९५ टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे २९ कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने वर्षभरापूर्वी केली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याची दखल घेत नसल्याने मिरज सुधार समितीने राज्य सरकार तसेच, विविध लोकप्रतिनिधिंकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत बुधवारी विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर राज्य सरकारने या कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मिरज सुधार समितीच्या वर्षभराच्या लढ्याला प्राथमिक यश आले आहे.
मिरज-सांगली रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता हा रस्ता सहा पदरीकरण करणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे10 किमी अंतराचा 95 टक्के सुस्थितीत असणाऱ्या मिरज- सांगली रस्त्यावर रस्ता करुन सुमारे २९ कोटींचा निधीचा चुराडा केला जात असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीने सर्वप्रथम 30 मे 2024 रोजी केली होती. सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही दिला होता.
सार्वजनिक बांधकाम विभाग थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेत होते. मात्र, मिरज सुधार समितीने या रस्ता कामाची चौकशीसाठी राज्य सरकार तसेच, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला होता. याचीच दखल घेत बुधवारी विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी या रस्ता कामाच्या खाबूगिरीचे वाभाडे काढत लक्षवेधी सूचना मांडली. राज्य सरकारने याची दखल घेत सांगली-मिरज रस्ता कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे.
याबाबत मिरज सुधार समितीने आमदार सदाभाऊ खोत यांचे आभार मानले आहे. तसेच, चौकशी समितीची भेट घेऊन या रस्ता कामाबाबत आवश्यक ते पुरावे सादर करणार असल्याचे मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, असिफ निपाणीकर, रविंद बनसोडे, दिनेश तामगावे आदी उपस्थित होते.
(मिरज-सांगलीचे आमदार मूग गिळून गप्प )
मिरज - सांगली रस्ता कामाची निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी मिरज सुधार समिती मिरज-सांगली आमदारांकडे पाठपुरावा केला होता. मात्र, गैरकामाबाबत मिरज-सांगलीचे आमदार मूग गिळून गप्प राहिले. अखेर, याबाबत विधानपरिषद आमदारांनी आवाज उठविला.. अशी टीका मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी यांनी केली)