yuva MAharashtra 🔴 मिरजेत 95 वर्षांपूर्वी हायकोर्टची स्थापना 🔴 दोन न्यायाधीशांचे बेंच

🔴 मिरजेत 95 वर्षांपूर्वी हायकोर्टची स्थापना 🔴 दोन न्यायाधीशांचे बेंच


🔴 मिरजेत 95 वर्षांपूर्वी हायकोर्टची स्थापना 

🔴 दोन न्यायाधीशांचे बेंच

संदर्भ : मिरज इतिहास संशोधक मंडळ मानसिंगराव कुमठेकर

दीर्घ लढ्यानंतर आज कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू होत आहे. मात्र, ९५ वर्षांपूर्वीच मिरज येथे स्वतंत्र हायकोर्ट स्थापन झाल्याचे आढळते. १५ सप्टेंबर १९३० रोजी मिरज संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत गंगाधरराव उर्फ पटवर्धन (तिसरे) यांनी जाहिरनामा प्रसिद्ध करून मिरजेत स्वतंत्र हायकोर्ट स्थापन केल्याची घोषणा केली. हा मूळ जाहिरनामा मिरज येथील मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात आहे. सन १९४८ पर्यंत मिरजेत हे हायकोर्ट सुरु असल्याचे दिसते. 

   गेली ४०वर्षांहून अधिक काळ सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी आंदोलने सुरू होती. नागरिकांसह वकील संघटनांनी वेगवेगळ्या मार्गांनी निवेदने देऊन, आंदोलने करून कोल्हापुरात खंडपीठ निर्मितीसाठी आग्रह धरला होता. 

    या सर्वांच्या आंदोलनाला यश येऊन कोल्हापुरात खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला. आजपासून हे खंडपीठ सुरु होत आहे. 

     मात्र, सुमारे ९५ वर्षांपूर्वी तत्कालीन मिरज संस्थानात स्वतंत्र हायकोर्ट स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी स्वतंत्र नियमावलीही करण्यात आली. ता. १ सप्टेंबर १९३० रोजी मिरज संस्थानने स्वतंत्रपणे जाहीरनामा काढून मिरजेत हायकोर्ट स्थापन करण्याबाबत घोषणा केली होती. पंधरा सप्टेंबर १९३० सालापासून हे हायकोर्ट सुरू झाले. या हायकोर्टमध्ये दोन न्यायाधीशांचे बेंच करण्यात आले. रावबहादूर बाबुराव काशिनाथ जोशी आणि रावसाहेब विष्णू सिताराम घोलकर हे पहिले दोन न्यायाधीश होते.

 सदरचा अस्सल मूळ जाहीरनामा मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या मानसिंग कुमठेकर संग्रहात आहे. या जाहिरनाम्यावरून मिरज संस्थानातील हायकोर्टचे स्वरूप कसे होते, त्याची इत्यंभूत माहिती मिळते 

    हायकोर्ट कसे असावे, हायकोर्टाची रचना कशी असेल, त्यांचे काम काय असेल, न्यायाधीशाची पात्रता, कामकाजाचे स्वरूप, कर्मचाऱ्यांची नेमणूक, हायकोर्टात दाखल होणाऱ्या केसेसचे स्वरूप, हायकोर्टाद्वारे दिल्या जाणाऱ्या निकालांचे स्वरूप कसे असेल, न्याय पद्धती कशी असेल अशा न्यायालयासंदर्भातील अनेक बाबींचा उल्लेख या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. त्यावरून ९५ वर्षांपूर्वी मिरजेत स्थापन झालेले हायकोर्ट कसे होते याची कल्पना येते.

©️ मानसिंगराव कुमठेकर

       9405066065