🟣 आयुक्त साहेब मिरजेतील अतिक्रमण हटाव मोहिम ’’फार्स’ ठरु नये...!
🟣 आयुक्त्तांची ’’गांधीगिरी’’ छत्रपती शिवाजी महाराज रोड, गांधी चौक व शास्त्री चौकात होऊ दे
🟣 शहरात वाहतूकीचा प्रश्न गंभीर, मोहिम ठरते केवळ फार्स,
🟣 महापालिकेकडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पत्रांना केराची टोपली
वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटाव मोहीम महापालिका आयुक्त सत्यम गांधी राबवित आहेत. सागली नंतर शुक्रवारी आयुक्तांनी आपला मोर्चा मिरज शहराकडे वळविला आहे. मात्र, शुक्रवारी आयुक्तांची अतिक्रमण हटाव मोहिम फारशी प्रभावी झाली नाही.
शहरातील वाहतुकीस अडथळ ठरणारे शास्त्री चौक, गांधी चौक, स्टेशन चौकासह प्रमुख चौकातील फेरीवालेसह विविध पानटपर्या, महापालिकेचे मुव्हेबल खोकी, त्या खोक्यासमोर भररस्त्यावर मांडलेले विक्रीचे साहित्य व त्यासमोर पार्किंग केलेले वाहन हे शहरातील प्रमुख चौकात वाहतूकीची प्रचंड कोंडी होण्यास कारणीभूत असते. हे दृश्य शहरातील प्रत्येक चौक व मुख्य रस्त्यावर पाहण्यास मिळते.
महापालिका प्रशासन अतिक्रमण हटाव मोहिम जोमात राबविली जाते. पण काही तासानंतर महापालिका कारवाई करुन काढलेले अतिक्रमण परत त्याच ठिकाणी बसलेले दिसतात. एकदा अतिक्रमण मोहीम राबवल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची जबाबदारी मात्र महापाालिकेकडून घेतली जात नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम हा केवळ फार्स होऊन शहरातील तो एक चेष्टाचा ठरत असते, हा आजपर्यंंतचा अनुभव आहे.
काही वर्षापूर्वी शहरातील प्रमुख चौक असलेले जेथे वाहतूकीची कोंडी वारंवार होत असते अशा स्टेशन चौक (अब्दुलकरीम खाँ चौक) येथे महापालिकेने मुव्हेबल खोकी बसविली आहेत. या खोक्यांमुळे स्टेशन रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखीनच गंभीर बनणार असल्याने काही जागृत नागरिकांनी महापालिकेत या खोक्यांच्या पुनर्वसनाला विरोध केला. शिवाय मिरज शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने या मुव्हेबल खोक्यांमुळे स्टेशन चौकात वाहतूकीचा प्रश्न आणखी गंभीर बनणार असल्याने येथे खोक्यांचे पुनर्वसन करु नये, असे पत्र महापालिकेला दिले होते. पण तरीही वाहतूक नियंत्रण शाखेच्या पत्राला केराची टोपली दाखवून मुव्हेंबल खोकी बसविण्यात आली आहेत.
हीच परिस्थिती गांधी चौकातही आहे. या चौकामध्ये मुव्हेबल खोकी फुटांपर्यंत जागा त्या खोकीधारकांचा विविध खाद्य पदार्थ बनवणारे साहित्य, त्यासमोर ग्राहकांची दुचाकी वाहनांची दोन दोन रांगा यामुळे गांधी चौकात वाहतूकीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. येथे वाहतूक नियंत्रणचे दोन तीन कर्मचार्याची कायम नियुक्ती असते. पण हा प्रमुख चौक असल्याने त्यांच्याही कामाला मर्यादा येतात.
शहरातील बहुचर्चित रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याशेजारील अतिक्रमणामळे २२ मीटरचा रस्ता १० मीटर सुद्धा राहिलेला नाही. हा रस्ता करण्यासाठी मिरज सुधार समिती गेल्या एका दशकापासून आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. मिरज सुधार समिेतीच्या पाठपुराव्यामुळ रस्ता होऊन रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसविण्यात आले आहेत. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने या रस्त्यावर वाहन चालविणे सोडा चालत जाणेही नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे.
एकंदरीत शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम प्रत्येक वेळेला फार्सच ठरत असल्याने याची सवय महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला, खोकीधारक, फेरीवाले, विक्रेते आणि सर्वसामान्य मिरजकरांना झाली आहे.त्यामुळे महापालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम हे शहरातील चेष्टाचा विषय तर वाहतुक कोंडीचा विषय गंभीर बनला आहे. म्हणून आयुक्त सत्यम गांधी यानी सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिम कौतुकास्पद आहे. मात्र, या मोहिमेत सातत्य ठेवल्यास निश्चितच मिरज शहर मोकळा श्चास घईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य मिरजकरांची आहे.

.jpg)