डेमू रेल्वेचा फ्लॅटफॉर्म बाहेर थांबा
मुख्य प्रवेशद्वारावर येण्यासाठी प्रवाशांना करावी लागते पायपीट
रेल्वे प्रवासी संघाच्या कार्यकर्त्यांंनी रेल्वे अधिकार्यांना विचारला जाब
--------------------------------------------------------------------------------------
नव्याने सुरु झालेल्या हुबळी-मिरज, लोंढा-मिरज आणि परळी-मिरज डेमू रेल्वे मिरज स्थानकाच्या फ्लॅटफॉर्म बाहेर थांबत आहे. रेल्वे प्रवाशांना सुमारे अर्धा किलो मीटर पायपीट करीत मुख्य प्रवेशद्वार यावे लागत असल्याने संतप्त झालेल्या रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांंनी मिरज स्टेशन अधिक्षकांना जाब विचारत गाड्या पूर्ववत फ्लॅटफॉर्मवरच थांबविण्याची मागणी केली.
दक्षिण-पश्चिम रेल्वेने नुकतेच हुबळी-मिरज, लोंढा-मिरज आणि परळी-मिरज, बेळगांव-मिरज या डेमू रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. हुबळी-मिरज, लोंढा-मिरज आणि परळी-मिरज या गाड्या फ्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबतात. मात्र, डेमू गाड्यांना दोन्ही बाजूला इंजिन असल्याने इंजिनमध्ये तेल भरण्यासाठी डेमू चालक गाड्या फ्लॅटफॉर्म सोडून सुमारे अर्धा किमी पुढे सांगलीच्या दिशेने थांबा करीत असल्याने प्रवाशांना पायपीट करीत मुख्य प्रवेशद्वारावर यावे लागते. डेमू चालकाच्या या कामचुकारपणामुळे स्थानकावर येणारे रुग्ण, वयोवृध्द आणि महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
म्हणून शुक्रवारी रेल्वे प्रवासी संघाचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष वसीम सय्यद, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे, अझीम बागवान, अमीर डांगे, पापा पठाण, नागेश राठोड, बरकत मुजावर, हसन शेख, मोहसील लांडगे, उस्मान पखाली, जुबेर शेख आदी कार्यकर्त्यांंनी मिरज स्टेशन अधिक्षक जे. आर. तांदळे यांना जाब विचारला असता, डेमू इंजिनमध्ये तेल भरण्यासाठी गाड्या पुढे न्यावे लागत असल्याचे मान्य करीत गाड्या पूर्ववत फ्लॅटफॉर्मवर थांबा करण्याबाबत संबधितांना सुचना केली असल्याची माहिती स्टेशन अधिक्षक जे. आर. तांदळे यांनी कार्यकर्त्यांंना दिली.
