yuva MAharashtra ♦️ जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा ♦️ मिरज सुधार समितीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

♦️ जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा ♦️ मिरज सुधार समितीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन



♦️ जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा

♦️ मिरज सुधार समितीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

 राज्य सरकारने जन्म-मृत्यू दाखल्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, प्रांत कार्यालयातील कर्मचारी वर्ग हे आकृतीबंध असल्याने एकाच कर्मचाऱ्यावर जन्म-मृत्यू दाखल्याचा अतिरिक्त कारभार पडत असल्याने दाखल्यासाठी आदेश देण्याचे काम अत्यंत संथगतीने होत आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू दाखल्यासाठी नागरिकांना प्रांत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. म्हणून जन्म-मृत्यू दाखल्यासाठी स्वतंत्रपणे व्यवस्था करण्याची मागणी मिरज सुधार समितीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

जन्म-मृत्यूचे दाखले नसलेले प्रकरणे बहुतांश अशिक्षित आणि गरीब नागरिकांची असतात. मिरज प्रांत कार्यालयात जन्म-मृत्यू विभाग स्वतंत्र नाही. या कार्यालयातील रुपेश नावाच्या कर्मचाऱ्याकडे जन्म मृत्यू दाखल्यांचे काम आहेत. मात्र, त्याच्याकडे गौण खनिजसह अन्य सुमारे सात ते आठ विभागाचा पदभार असल्याने जन्म-मृत्यू दाखल्याची प्रकरणे अत्यंत संथगतीने निर्गत होत आहेत. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असून त्यांना प्रांत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

म्हणून मिरज प्रांंत कार्यालयात जन्म-मृत्यू विभागासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमून जन्म-मृत्यू प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्याची मागणी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, दिनेश तामगावे, वसीम सय्यद, झीशान मुश्रीफ, अमीर डांगे, अभिजीत दाणेकर आदी सदस्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे केली आहे. प्रांताधिकारी श्री. दिघे यांनी याबाबत आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन मिरज सुधार समितीला दिले आहे.