yuva MAharashtra मिरजेतील प्रभाग क्र. ६ नायकवडीमुक्त होणार का...?

मिरजेतील प्रभाग क्र. ६ नायकवडीमुक्त होणार का...?

 


🔵मिरजेतील प्रभाग क्र. ६ नायकवडीमुक्त होणार का...? 

🔵तडजोडीच्या राजकारणामुळे नायकवडींना हक्काचा प्रभागाला मुकावे लागणार 

🔵जामदार-बागवानच्या खेळीने आ. नायकवडींची गोची 

🔵नायकवडी समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता

 ( लेख : अ‍ॅड. ए. ए. काझी संस्थापक - मिरज सुधार समिती)

गेली अनेक वर्षे मिरज शहराचे राजकारण नायकवडी, जामदार आणि आवटी या घराण्यातच घोंगावत असत. मात्र, महापालिका स्थापनेनंतर यात माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी स्थायी समिती सभापती संजय मेंंढे आणि माजी नगरसेवक कै. महंमद (बावा) काझी यांचीही भूमिका अनेक वेळा महत्वाची ठरली. मात्र बावा काझींच्या निधनानंतर काझी गट विस्कटल्याने हा गट राजकीय प्रवाहातून काही प्रमाणात मागे पडला. त्यामुळे नगरपालिका असताना किंवा सध्याची महापालिका मिरजेच्या कारभाराची चावी नायकवडी, जामदार आणि आवटी यांच्यातच राहिले. मात्र, याचा काहीच फायदा शहर विकासाला झाले नसल्याचे मिरज शहराच्या दुरावस्थेकडे बघून लक्षात येते. 

प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना डोळे मारुन राजकारण करणारे किशोर जामदार व इद्रिस नायकवडी हे दोघे  गत २०१८च्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने प्रभाग क्र. ५ मध्ये किशोरदादांचे पुत्र करण जामदार यांनी इद्रिसभाईंचा आश्चर्यकारकरित्या निसटता पराभव केला. तर, प्रभाग क्र. ७ मध्ये कधी काळी किशोरदादांचा कार्यकर्ता राहिलेले भाजपचे गणेश माळी यांनी काँग्रेसचे किशोरदादा विरोधात अटीतटीत विजयश्री खेचून घेतली. गणेश माळी यांच्या विजयात इद्रिसभाईंचा सिंहाचा वाटा राहिल्याने याचे शल्य कायम किशोरदादांचा मनात राहिले. 

मिरज शहरातील मुजावर गल्ली, गुरुवार पेठ, मटण मार्केट परिसर, बोकुड चौक परिसर, काझी वाडा परिसर, सौदागर गल्ली, छलवादी गल्ली, धनगर गल्ली, सांगली वेस परिसर असलेला प्रभाग क्र. ६ हा  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांचा बालेकिल्ला राहिला आहे. इद्रिसभाई यांचे वडील जेष्ठ नेते पै. इलियास नायकवडी जनाब यांचे या प्रभागावर अधिक प्रभाव राहिल्याने गेल्या ४० वर्षापासून या प्रभागात इद्रिसभाई नायकवडी, त्यांच्या पत्नी सौ. आयेशाभाभी नायकवडी,  आई श्रीमती हसिनाभाभी नायकवडी, पुत्र अतहर नायकवडी यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यामुळे प्रभाग क्र. ६ मध्ये इद्रिसभाई सांगतील तेच... असे समिकरण आजपर्यंत राहिले आहे. म्हणून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आ. इद्रिसभाई समर्थकांनी प्रभाग क्र. ६चे उमेद्वार म्हणून सर्वसाधारण गटातून जमील बागवान, आझम महंमद काझी, सर्वसाधारण महिला गटातून आयेशाभाभी नायकवडी आणि इतर मागास प्रवर्ग महिला गटातून डॉ. नर्गिस सय्यद यांचे छायाचित्र असलेले पोस्टर सोशल मिडीयावर व्हायरल केले. आता अतहर नायकवडी हे हक्काचा प्रभाग क्र. 6 सोडून प्रभाग क्र. 20 मधून लढत आहेत.  माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी काही महिन्यांपासून आमदार जयंत पाटील यांच्यापासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास आग्रही होते. मात्र, आ. इद्रिसभाईंचा त्याला तीव्र विरोध दर्शविल्याने बागवान यांची गोची झाली होती. 

मात्र, बागवान यांनी अजित पवार गटात प्रवेश मिळविण्याचे प्रयत्न सुरुच ठेवत त्यांनी आ. इद्रिसभाईंचा पक्षांतर्गत विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या माध्यमातून मोट बांधत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी महापौर किशोरदादा जामदार यांच्यासह काही माजी नगरसेवकांना सोबत घेत थेट बारामती गाठली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपला प्रवेश पक्का केला. १९ डिसेंंबरला मिरजेत ना. अजितदादांच्या उपस्थितीत माजी महापौर किशोरदादा जामदार, मैनुद्दीन बागवान यांच्यासह अन्य काही प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यात मैनुद्दीन बागवान यांच्या गटाच्या अ‍ॅड. बिल्कीस शेख यांचा समावेश आहे.  अ‍ॅड. शेख या सर्वसाधारण महिला गटातून इच्छुक आहेत. 

मात्र, आ.इद्रीसभाईंनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अप्रत्यक्षरित्या प्रभाग क्र. ६ चे उमेदवार म्हणून सर्वसाधारण गटातून जमील बागवान, आझम महंमद काझी, सर्वसाधारण महिला गटातून आयेशाभाभी नायकवडी आणि इतर मागास प्रवर्ग महिला गटातून डॉ. नर्गिस सय्यद यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, बदलत्या राजकीय तडजोडीत आ. इद्रिसभाईंचे त्यांचे विश्वासू सहकारी असलेले जमील बागवान ऐवजी मैनुद्दीन बागवान आणि पत्नी आयेशा नायकवडी ऐवजी बिल्कीस शेख यांना पॅनेलमध्ये घ्यावे लागणार आहे. 

 तडजोडीच्या राजकारणातून नायकवडी कुटुंबियांना हक्काच्या प्रभाग क्र. ६ मधून मुकावे लागणार का...? ही निवडणूक नायकवडीमुक्त होणार का...? अशा प्रश्नांनी आ. इद्रिस नायकवडी समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे दिसून येते. 

किशोरदादांनी डाव साधला...

जयंत पाटील समर्थक असलेल्या मैनुद्दीन बागवान आणि आ. इद्रिस नायकवडी यांच्यात गेल्या वर्षभरापासून टोकाचा संघर्ष आहे. यातून आ. नायकवडींनी बागवान यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाला तीव्र विरोध केला. महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती नेतृत्व आ. नायकवडी करतात. मात्र, त्यांच्या नेतृत्वाला सांंगलीतील काहींचा विरोध होता. मैनुद्दीन बागवान यांनी गत महापालिका निवडणुकीत दुखावलेल्या किशोरदादांशी संधान साधत आ. नायकवडींविरोधात खेळी केली. आयत्या मिळालेल्या संधीचा फायदा घेत किशोरदादांनी महापालिका निवडणुकीत मिरजेतील उमेद्वार निवडीची सुत्रे आपल्या हातात घेत डाव साधल्याची चर्चा शहरात आहे.