मिरजेच्या राज खतीब पोलिसाला मुंबईत अटक
पोलीस अधिक्षकाची वर्दी घालून करत होता मांडवली
मिरजेचा रहिवासी असलेला उचापतीखोर पोलीस कर्मचारी महमदगौस उर्फ राज खतीब हा मुंबईत पोलीस अधिक्षकाची वर्दी घालून एका प्रकरणात मांंडवली (तडजोड) करताना मुंबई क्राईम ब्रॉच पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार शुक्रवारी घडल्याचे सांगण्यात आले. राज खतीबसोबत त्याच्या मुलाला सुध्दा पोलिसांनी अटक केली आहे.
राज खतीब नावाचा पोलीस कर्मचारी काही वर्षे सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबईला विनंती बदली करुन घेतली होती. कराटे, किक बॉक्सिंग आदी खेळाचे प्राविण्य असलेल्या राज खातीब हा वरिष्ठ पोलीस अधिकार्यांबरोबरच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांसमवेत छायाचित्रे काढून त्या छायाचित्रांच्या मदतीने वरिष्ठ अधिकारी व अभिनेत्यांशी आपली खास ओळख असल्याचे भासवून पीडित व्यक्तींकडून रक्कम उकळत असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईतील राज खतीब हा पोलीस कर्मचारी पोलीस अधिक्षकाची वर्दी घालून एका प्रकरणात मांडवली (तोडपाणी) साठी गेला असता, त्याचे वर्तन पाहून तेथील लोकांना शंका आली. याची माहिती मुंबई क्राईम ब्रॉच पोलिसांना मिळताच पोलिसांनी राज खतीब बरोबरच त्याच्या मुलालाही अटक केली. त्याच्याकडे पोलीस अधिक्षक पदाच्या नावाने बोगस ओळखपत्र सापडल्याचे समजते. मिरजेचा रहिवासी असलेल्या राज खतीबचे प्रताप मुंबईत उघड झाल्याने मिरज शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
पोलिसात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक...सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या राज खतीब हा पोलीस कर्मचारी वरिष्ठ अधिकार्यांसमवेत असलेले छायाचित्र दाखवून पोलीस दलात नोकरीस लावतो. म्हणून सांगली, कोल्हापूरसह पुणे जिल्ह्यातील अनेक तरुणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. काही तरुण मिरज सुधर समितीच्या संपर्कात आहेत. या तक्रारींची चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने पोलीस महासंचालकांकडे करणार असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी यांनी दिली.
