yuva MAharashtra लोकप्रतिनिधी बरोबरच अधिकाऱ्यांची सुद्धा मिरज जंकशनबाबत इतकी अनास्था का..?

लोकप्रतिनिधी बरोबरच अधिकाऱ्यांची सुद्धा मिरज जंकशनबाबत इतकी अनास्था का..?

 


🛑 रेल्वे महाव्यवस्थापकांच्या भेटीला आलेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांना भेट नाकारण्याचे इंगित काय..?
🛑 स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे मिरज सुधार समितीने संयम बाळगला 
------------------------------------------
मिरज रेल्वे जंक्शन मॉडेल स्टेशनबाबत अनेकदा घोषणा झाल्या. २०२६च्या केंद्रिय अर्थसंकल्पात मिरज रेल्वे जंक्शनचे पुन्हा नव्याने अमृत योजनेत समावेश केला. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून  बुधवारी रात्री सोलापूर विभागीय पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने मिरज जंकशनवर आलेले मध्य रेल्वे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी मिरज जंकशनच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी आलेल्या मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाच्या कार्यकर्त्यांना भेट नाकारल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. मात्र, स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे सुधार समितीचे कार्यकर्त्यांनी संयम बाळगला.

 
रेल्वे मंत्रालयाने मिरज रेल्वे जंक्शनपासून सुमारे एक किमी अंतरावरील कार्डलाईन स्टेशनसाठी १२८.७८ कोटींची निधीला मंजूरी दिली आहे. कार्डलाईन स्टेशनचा  विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुध्दा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. जेणेकरून आताचे मिरज रेल्वे जंक्शन आणि नव्याने होणारे कार्डलाईन स्टेशन या दोन्ही स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी कशा पध्दतीने कनेक्टीव्हिटी असणार आहे? हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित ठेवून कार्डलाईन स्टेशनचा विकास करणे हे भविष्याच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रवाशांची गैरसोय आणि रेल्वेच्या आर्थिक तोट्याचे होणार आहे.

रात्री १२  वाजताची मिरज-बेल्लारी लिंक एक्स्प्रेस सुरु करणे, दुपारच्या सत्रात मिरज-पंढरपूर मार्गावर गाडी सुरु करणे, बेळगांव-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरु करण्याबरोबरच अजमेर-बेंगलोर, अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस, जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेस,गांधीधाम-बेंगलोर एक्स्प्रेस गाड्यांचे सकाळच्या सत्रात मिरज जंक्शनवरील थांब्याचा कालावधी वाढविणे तसेच मिरज जंक्शनवरील अस्वच्छतेबाबत तक्रारी आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन गंभीर नाही. 

 बुधवारी रात्री सोलापूर विभागीय पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने मध्य रेल्वे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव मिरज जंकशनवर आले होते. महाव्यवस्थापक श्रीवास्तव यांचा तब्बल तीन तास मिरज जंकशनवर थांबा होता. मिरज जंकशन विकास संदर्भात निवेदन देऊन चर्चा कारण्यासाठी रेल्वे प्रवासी संघांचे ऍड. ए. ए. काझी, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, सुरेश झेंडे, दिनेश तामगावे, अमीर डांगे आदी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाच्या कार्यकर्त्यांनी महाव्यवस्थापकांकडे केवळ 5 मिनिटे भेटीची वेळ मागितली असता, आगस्ट महिन्यात मिरज जंकशनच्या दौऱ्यावेळी भेटण्याचा निरोप देत भेट नाकारत महालक्ष्मी एक्सप्रेसने मुबंईकडे रवाना झाले. 

कोल्हापूर, कुडची, घटप्रभा, बेळगांव, हुबळी आदी स्थानके मॉडेल स्टेशन होत असताना मिरज जंकशन विकासाबाबत लोकप्रतिनिधी बरोबरच रेल्वे अधिकाऱ्यांच्या अनास्थेबाबत मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.