🛑 महापालिका मिरज कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा मोडकळीस काढायची आहे का...?
🛑 गणेशोत्सवाच्या तोंडावर सहाय्यक आयुक्त अनिस मुल्लांची बदली
🛑 नव्या सहाय्यक आयुक्तांमुळे समस्यांचा पाढा पुन्हा अ...ब..क..ड.. पासून
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या कर्तव्यदक्ष आयुक्त संजीता महापात्रा मॅडम यांनी प्रशासकीय कारणास्तव महापालिकेतील विविध अधिकार्यांच्या बदल्या तसेच, अनेकांचे विभाग पदभार बदलला आहे. याबाबतचे नोटीफिकेशन बुधवार १ जूलै २०२६ रोजी निघाले. आयुक्तांच्या या नोटीफिकेशनमध्ये मिरज विभागीय कार्यालय (प्रभाग समिती क्र. ४) चे प्रभारी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांची कुपवाड कार्यालय (प्रभाग समिती क्र. ३) या ठिकाणी बदली केली आहे.
मुळातच महापालिकेचे मिरज विभागीय कार्यालयाची प्रशासकीय घडी पुर्णत: विस्कळीत झाली आहे. आयुक्त संजीता महापात्रा यांची मिरज कार्यालयात कधीतरी ’’सरपराईज व्हिजीट’’ असते. (स्वत:च्या घरात येणे म्हणजे ते सरपराईज व्हिजीट होत नाही. हे कदाचित आयुक्त मॅडम विसरल्या असतील). उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांचे अधूनमधून दर्शन होते. मात्र, त्यांचा बहुतांश वेळ सांगली मुख्यालयात अन्य प्रभारी विभागाच्या बैठकीमध्ये जातो. त्यामुळे मिरज विभागीय कार्यालयात येणार्या नागरिकांना तोंड देणारे व हमखास भेटणारे अधिकारी म्हणून प्रभारी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी अतिशय संयमाने किमान नागरिकांच्या अडचणी तरी, ऐकून घेत होते. (अडचणी / समस्या दूर करणे हा नंतरचा भाग). त्यामुळे गेल्या तीन वर्षात सहाय्यक आयुक्त मुल्ला यांना मिरज शहराबरोबरच उपनगरातील गंभीर समस्यांची इतंभूत माहिती झाली होती. शिवाय, सहाय्यक आयुक्त मुल्ला यांनी गेल्या तीन वर्षात गणेशोत्सव, मोहरम, हजरत मिरासाहेब दर्गा उरुस, शिवजयंती, बसवेश्वर जयंतीसह अन्य सार्वजनिक उत्सवात महापालिकेच्या वतीने सुरेख नियोजन करण्यात महत्वाचा सहभाग घेतल्याने हे सर्व उत्सव अत्यंत उत्साहपुर्ण, कायदा व सुव्यवस्था अबादित राखत संपन्न झाले.
अशी वस्तुस्थिती असताना, आयुक्त मॅडम यांनी प्रशासकीय कारणांसाठी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांची कुपवाडला बदली करुन त्यांच्या ठिकाणी मिरजेच्या प्रश्नांची पुर्णपणे माहिती नसलेले नवखे सचिन सागांवकर यांची बदली केली आहे. सागांवकरांना पुन्हा नव्याने अ...ब...क...ड... पासून सुरुवात करावी लागणार आहे. यातून प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? हेच समजत नाही.
मिरज विभागीय कार्यालयास येण्यास आयुक्त संजीता महापात्रा मॅडम असो की अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे असो... यांना वेळ मिळत नाही. पण किमान जे मिरज कार्यालयात नागरिकांना हमखास भेटणारे अधिकारी अशी ख्याती मिळविलेले सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सारख्या अधिकार्यांची बदली करुन आयुक्तांना मिरज विभागीय कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणाच मोडीत काढायची आहे का...? असा संतप्त सवाल मिरज सुधार समितीने व्यक्त केला आहे.
