yuva MAharashtra माझी भाजपाची उमेद्वारी का...?अ‍ॅड. काजी अल्लाबक्ष (प्रभाग क्र. ६ क चे भाजपाचे अधिकृत उमेद्वार)

माझी भाजपाची उमेद्वारी का...?अ‍ॅड. काजी अल्लाबक्ष (प्रभाग क्र. ६ क चे भाजपाचे अधिकृत उमेद्वार)


 सुमारे १४०० वर्षाचा इतिहास असलेले महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील अत्यंत महत्वाचे  शहर म्हणून मिरज शहराचा उल्लेख केला जातो.  मिरज रेल्वे जंक्शन, वैद्यकीय पंढरी, संगीताचे माहेरघर, हजरत मिरासाहेब दर्गा, ऐतिहासिक श्री गणेश मंदिर, जेष्ठ कलाकार बालगंधर्वांची जन्मभूमी, संगीतकार ख्वॉ अब्दुलकरीम ख्वॉंची कर्मभूमी असे वैशिष्ट्य असलेले मिरज शहराचा तत्कालीन मिरज नगरपालिका असो किंवा आताची सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका असो मिरज शहर हे विकासापासून वंचितच राहिला आहे.  

याला एकमेव कारणीभूत असेल तर ती, मिरजेतील काही राजकीय घराण्याची मक्तेदारी आणि आपल्याच भाकरीवर लोणी या प्रवृत्त्तीमुळे मिरज शहर हे विकासाबाबतीत मागासच राहिले. याची जाणीव होऊन मी मिरज शहरातील सामाजिक चळवळीची जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून  ’’लढा आपल्या हक्कासाठी...’’  हा ब्रिद घेऊन  भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी म्हणजे २६ जानेवारी २००५ साली मिरज सुधार समिती या नावाने सामाजिक चळवळ सुरू केली.

मिरजेत प्रस्थापितांविरोधात लढा देताना मला स्वत:च्या घरातूनच नगरसेवक असलेले चुलते आणि मावस भावाची नाराजी सुध्दा पत्कारावी लागली.  मात्र, मी भावकीची नाराजीला न जुमानता मिरज शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी मिरज सुधार समितीचा लढा सुरूच ठेवला.

शहरातील वाढती गुन्हेगारी विशेषत: तरुणाईमध्ये वाढत चाललेली गांजा, चरस, अफिम, नशेच्या गोळ्यांचे प्रमाणामुळे तरुणांची तरुणाई बरोबरच त्यांचे घरदारच उद्वस्त होत असल्याचे चिंताजनक चित्र मध्यमवर्गीय परिसरात पहावयास मिळत आहे. या व्यसनाधिनतेचे सर्वाधिक प्रमाण हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या हजरत मिरासाहेब दर्गा परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्र. ६ मध्ये असल्याचे चिंताजनक बाब माझ्या निदर्शनास आली.

तरुणाईला व्यसनाधिन बनविण्यासाठी या प्रभागातील झुंडशाही वृत्ती असलेल्या काही राजकीय लोकप्रतिनिधींच्या टोळीचा सहभाग असल्याचे धक्कादायक बाब लक्षात आली. त्यामुळे प्रभाग क्र. ६ मधील सर्वसामान्य नागरिक तसेच, व्यसनाधिन झालेल्या तरुणांचे कुटूंबियांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे. प्रभाग क्र. ६मधील जनता या झुंडशाही आणि नशेखोरीला अक्षरश: वैतागली असताना, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणुकीचे बिगूल वाजले.

सात वर्षे प्रभागाच्या विकासाकडे पुर्णत: दुर्लक्ष करुन उलट तरुणाईमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढविणाऱ्या प्रभाग क्र. ६ मधील झुंडशाही वृत्ती असलेल्या लोकप्रतिनिधींना पुन्हा निवडून येण्याचे डोहाळे लागले झुंडशाही टोळीतील सदस्यांनी राष्ट्रवादीच्या ’’घड्याळ्याची करेक्ट’’ वेळ साधत सत्ताधारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

झुंडशाही वृत्तीला थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची साथ मिळाल्याने प्रभाग क्र. ६मध्ये निवडणूक होणार की नाही...? असा प्रश्न या भागातील भयभीत झालेल्या  सर्वसामान्य नागरिकांना पडला होता.

काही सुज्ञ नागरीकांनी ही बाब सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या आमच्या मिरज सुधार समितीच्या निदर्शनास आणून दिली.  प्रभाग क्र. ६ मधील झुंडशाही आणि नशेखोरी आता, नाही रोखली तर, भविष्यात समाजाचे फार मोठे आणि कधीही न भरुन येणारे नुकसान होणार असल्याची जाणिव मला झाली. तेंव्हाच मी निर्धार केला की, कोणत्याही परिस्थितीत प्रभाग क्र. ६ चा परिसर  भय व नशामुक्त करण्याच्या प्रामाणिक उद्देशातून माझी उमेद्वारी जन्मास आली. सुरुवातीला मी प्रभाग क्र. ६ मधून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे मागणी केली. मात्र, प्रभाग क्र. ६मधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले काही लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत खासदार विशालदादांचे काम केल्याने खासदारांना त्या लोकप्रतिनिधींची उतराई करावयाची असल्याने त्यांनी माझ्या उमेद्वारीबाबत केवळ चालढक्कल करत वेळ मारुन नेण्याचेच काम केले.

मला काँग्रेस पक्षाची उमेद्वारी देण्याबाबत खासदारांच्या मनात पाप असल्याचे माझ्या लक्षात आले. शिवाय, सत्ताधारी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या झुंडशाहीवृत्तीच्या लोकप्रतिनिधी विरोधात लढायचे असेल तर, त्यापेक्षा सक्षम पक्ष हवा़ शिवाय, भाजपाचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी मिरासाहेब दर्गा विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिल्याने आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याविषयी या प्रभागातील जनतेच्या मनात सकारात्मक भावना आहे.  या सर्व बाबींचा विचार करुन मी भारतीय जनता पार्टी पक्षाची उमेद्वारी घेण्याचा निर्णय केला. मात्र, तेंव्हापर्यंंत भाजपाच्या इच्छुक उमेद्वारांची मुलाखतीची प्रक्रिया पुर्ण होऊन उमेद्वारीची निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली होती.  तरीही, एकदा भाजपाच्या उमेद्वारीबाबत भाजपाचे जेष्ठ नेते मकरंदभाऊ देशपांडे आणि भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या बंगल्यावर आ. सुरेशभाऊ खाडे, आ.सुधीरदादा गाडगीळ, मकरंदभाऊ देशपांडे, शेखर इनामदार साहेब, सुरेशबापू आवटी आदी नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपाची कोअर कमिटी बैठकीसाठी मला पाचारण केले.

ज्या प्रमाणे ’’जावहिराची पारख जव्हेऱ्यालाच असते’’ त्या प्रमाणे मिरज सुधार समितीच्या माध्यमातून मी मिरज शहराच्या विकासासाठी करीत असलेल्या कार्याची माहिती भाजप नेत्यांना होती. प्रभाग क्र. ६ च्या सर्वसाधारण गटात भाजपाकडे चार इच्छुक उमेद्वार असताना भाजपाच्या कोअर कमिटीने माझ्या सारख्या मुस्लिम समाजातील उमेद्वाराला सन्मानाने प्रभाग क्र. ६ सर्वसाधारण क गटासाठी उमेद्वारी दिली. या निवडणुकीचा निकाल काही लागो मला परवा नाही... पण हजरत मिरासाहेबांचे चरण स्पर्श झालेल्या प्रभाग क्र. ६ मधील सर्वसामान्य जनतेसाठी मी झुंडशाही व नशेखोरी विरोधात लढतोय, याचाच मला खरा आनंद आहे. 

आपला सेवक, 

अ‍ॅड. काजी अल्लाबक्ष अ. रहेमान

भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 

उमेद्वार प्रभाग क्र. ६ क गट