🔵तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे मार्गाबाबत मिरजेत घेतला होता निर्णय
🔵 या नव्या रेल्वे मार्गाने मिरज, सांगली, सातारा, बेळगाव भागाला " अच्छे दिन"
🔵 वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी मिरजकरांची भूमिका महत्वाची
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्याला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी प्रदीर्घ काळापासून प्रयत्नांची मशागत झाली. त्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बहुपर्यायी प्रस्तावांमधून सर्वात कमी खर्चाच्या आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वोत्तम वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे बी रोवले. त्यानुसार ''गुगल मॅप''च्या आधारे जिऑलॉजिकल सर्वेक्षण करून रेल्वे मंत्रालयाच्या शेवटच्या स्वतंत्र अर्थसंकल्पात तरतूदही केली.
त्यानंतर जवळपास आठ वर्षे अडगळीत गेलेल्या रेल्वेमार्गाच्या मुद्द्याला आता केंद्र आणि राज्य सरकारने भागीदारीतून पुढे नेण्यासाठी पाऊल टाकल्याने ‘अंकुर’ फुटू लागला आहे. त्यामुळे निश्चितच हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र लोहमार्गाने जोडण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होऊन वैभववाडी तालुक्याबरोबरच कोकणच्या पर्यटन, शेती व मासेमारीसह सर्वांगीण विकासाला ''हायस्पीड'' चालना मिळण्यास मदत होणार आहे. परंतु, हा रेल्वेमार्ग नियोजित कालखंडात पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला भूसंपादन आणि बोगद्यांच्या कामाबाबत सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे.
नव्वदच्या दशकात कोकण रेल्वे आकाराला येत असतानाच सुरू झाली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या विविध भागातून चिपळूण कराड, राजापूर कोल्हापूर, आर्चिणे (ता. वैभववाडी), दाजीपूर (ता. राधानगरी) अभयारण्यातून कोल्हापूर, सावंतवाडी-कोल्हापूर अशा बहुपर्यायी मागण्यांची मालिका सुरू झाली. परंतु, रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुरेश प्रभू यांनी २०१५ मध्ये मिरजेतील एका परिषदेत वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गावर एकमत केले. त्यानंतर दोन-तीन महिन्यातच वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची घोषणा केली.
तत्पूर्वीच मुंबईतील जे.पी. इजिनिअरिंग कंपनीमार्फत या रेल्वे मार्गासाठी ‘गुगल मॅप’द्वारे सॅटेलाईट सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करताना ३ हजार २०० कोटींच्या वैभववाडी-कोल्हापूर या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाची घोषणा केली. केवळ घोषणाच झाली नाही तर पुढच्याच वर्षीच्या म्हणजे २०१७ च्या अर्थसंकल्पात २५० कोटीची तरतूद केली. आणि स्वप्नवत वाटणारा हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात येईल, असे सर्वांना वाटू लागले होते.परंतु, त्यानंतर तब्बल आठ वर्षे या रेल्वे मार्गाची तसूभरही प्रगती दिसून आली नाही. त्यामुळे प्रभू यांनी रोवलेले वैभववाडी कोल्हापूर रेल्वेमार्गाचे ''बी'' गाडले जाण्याची चिन्हे दिसू लागली असतानाच २०२३ मध्ये ''पीएम गतीशक्ती'' योजनेंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या बैठकीत ३ हजार ४११ कोटी १७ लाखांच्या खर्चास शिफारस देण्यात आली आहे. त्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाची चिन्हे पुन्हा एकदा दिसू लागली होती.
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी मिरजकरांची भूमिका महत्वाची : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी गेल्या चार दशकापासून मागणी आहे. हा होण्यासाठी सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न संदर्भात काम करणाऱ्या मिरज सुधार समिती संलग्न रेल्वे प्रवासी संघ या संघटनेच्या वतीने २०१४ साली तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची वेळोवेळी भेट घेऊन पाठपुरावा केला होता. आता या मागणीला मूर्त स्वरूप येत आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी मिरजकरांची भूमिका महत्वाची राहिली आहे. हे प्रकल्प बिग बजेटचा असल्याने प्रकल्पासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीबरोबरच मिरज सुधार समिती, रेल्वे प्रवासी संघासारख्या संघटनांचा सातत्याने पाठपुरावा आवश्यक आहे.
रेल्वेमार्ग उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात गती येण्याची चिन्हेमागील दोन वर्षात या रेल्वे मार्गाबाबत कोल्हापूर आणि कोकणवासीयांची काहीशी निराशा झाली. दरम्यानच्या काळात केंद्रात मंत्री असताना खासदार नारायण राणे, माजी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री नितेश राणे यांच्यामार्फत या रेल्वे मार्गाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आता केंद्र आणि राज्याच्या भागीदारीतून हा रेल्वे मार्ग काढण्यात येणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या जमिनीचे भूसंपादन करण्याचे निर्देश दिल्यामुळे चौथ्यांदा रेल्वेमार्गाच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात गती येईल, असे स्थानिकांना वाटू लागले आहे.
असा आहे नियोजित रेल्वेमार्ग :वैभववाडी रोड रेल्वे स्थानक (नापणे) हे जंक्शन होणार असून या रेल्वेस्थानकातून सोनाळी, कुसूर कुंभारी, उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी (सिंधुदुर्ग) पुढे सैतवडे, कळे, भुये, कसबाबावडा, मार्केटयार्ड, कोल्हापूर असा १०७ किलोमीटर लांबीचा नियोजित रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर दहा स्थानके, पाच मोठे पूल, २६ बोगदे, याशिवाय छोटे-मोठे पूल असणार आहेत.
पर्यटन विकासासह शेती, मत्स्य व्यवसायाला बळ :
पर्यटन जिल्हा असूनही त्याचे मार्केटिंग होत नाही. त्यामुळे समृद्ध असलेल्या पर्यटनाला मर्यादा पडल्या आहेत. वैभववाडीपर्यंत येणारी रेल्वे भविष्यात विजयदुर्गला जोडली जाईल. त्यामुळे मत्स्योत्पादनासह आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, जांभुळ, करवंद यासह विविध फळे आणि त्यांच्या उत्पादनांची थेट वाहतूक पश्चिम महाराष्ट्रातून पुढे खानदेश, विदर्भ, मराठवाड्यापर्यंत होण्यास मदत होणार आहे. तसेच त्या भागातील शेतमाल सुरक्षितपणे थेट कोकणात येण्यास मदत होणार आहे. तसेच कोकणातील खनिज संपत्तीची वाहतूक रेल्वेमार्गाने जलदगतीने होऊ शकेल.
