मिरजकरांचा एकच सवाल...
दोन
वर्षात काय केले कमाल...?
खासदार
विशाल पाटलांच्या कारकिर्दीला दोन वर्ष पूर्ण
◆ मिरज
रेल्वे जंक्शन विकास खितपत
◆ छत्रपती शिवाजी महाराज रस्ता विषय
"जैसे थेच..."
◆ मिरज एमआयडीसी
शेवटची घटका मोजतेय...
◆मिरजेतील
रस्ता रुंदीकरणासाठी एकही बैठक नाही
------------------------------------------------------------------------------
सांगली
लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील यांच्या विजयाची दुसरी वर्षपूर्ती
म्हणजे आज 4 जून. दोन वर्षापूर्वी ४ जून २०२४ रोजी
मिरजकर-सांगलीकर जनतेने "विशाल" विजय देत "विशाल" यांना खासदार
केले. इंग्लिश
आणि हिंदीवर चांगले प्रभुत्व असणारा, विषयाची
मांडणी करण्यात पटाईत असलेल्या खासदार विशालदादांकडून मिरजकरांच्या अपेक्षा
निश्चित वाढल्या. मिरज रेल्वे जंक्शन विकासाला चालना मिळेल तसेच, गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या छत्रपती
शिवाजी महाराज रस्ता कामाला गती मिळेल, अशी आशा
मिरजकरांना होत्या. मात्र गेल्या दोन वर्षात खासदार विशालदादांनी विविध राष्ट्रीय
स्तरावरील विषयांवर लोकसभा गाजवली. मात्र, मिरज शहरातील केंद्राशी निगडीत अनेक
प्रश्न जसेच्या तसेच आहेत. त्यामुळे खासदारांचे संसदेतील भाषण "बोलाची कढी
आणि बोलाचे भात" अशी झाली आहे.
महाराष्ट्र
आणि कर्नाटक सीमेवरील महत्वाचे मिरज रेल्वे जंक्शन हे केंद्र सरकारच्या
अखत्यारितील विषय आहे. मात्र, केंद्रात
सत्त्ता असलेल्या भाजप खासदार संजयकाका पाटील यांचे मिरज रेल्वे जंक्शनकडे पुर्णत:
दुर्लक्ष झाल्याने मिरज जंक्शन तब्बल दहा वर्षे विकासापासून वंचित राहिला. विशेषतः
मिरज रेल्वे जंक्शनचे "मॉडर्न स्टेशन" बाबत काहीच ठोस पाठपुरावा खासदार
विशाल पाटील यांच्या कडून झाल्याचे दिसत नाही.? किमान
मिरज जंक्शन विकासासाठी रेल्वे विभागाची स्वतंत्र बैठक घेतल्याचे ना वाचण्यात आले, ना ऐकण्यात आले. उलट, गरज नसताना मिरजेतून सुटणाऱ्या रेल्वे
गाड्या सांगलीतून सोडण्याचा व थांबविण्याचा खासदारांचा अट्टाहास पाहता मिरज रेल्वे
जंक्शनचे महत्वच कमी करण्याचे षडयंत्र सुरू आहे का? असे
सर्वसामान्य मिरजकरांना वाटू लागले आहे.
मिरज सुधार समितीच्या रेट्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात ६ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत रस्ता पुर्णत्वास जाण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. मात्र, बैठकीत झालेल्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी आजतागायत झाली तर नाही, शिवाय गेल्या सात महिन्यांत या रस्त्यावरील एक दगडही हलला नाही. उलट, अर्धवट कामामुळे बसविण्यात आलेल्या पथदिवे अपघात होऊन ढासळत आहेत.
एकेकाळी मिरज
एमआयडीसी देशाच्या कानाकोपर्यात ओळखली जात होती. मात्र गेल्या काही वर्षात येथील
उद्धोजकांना केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सुविधाबाबत अक्षम्य दुर्लक्ष
झाल्याने उद्धोग बंद झाली आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. याबाबत खासदार विशाल
पाटील कुठेच बोलताना दिसत नाहीत.
मिरज शहरातील
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने शहरात वाहतूक कोंडी प्रश्न जटील बनले
आहे. शहरातील काही मोजक्या चार रस्त्यांचे रुंदीकरण केल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा
प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागू शकतो. याबाबत मिरज सुधार समितीने वेळोवेळी खासदारांना
निवेदन देऊन विनंती केली. मात्र रस्ता रुंदीकरणाबाबत गेल्या दोन वर्षात खासदारांना
साधे महापालिका सोबत बैठक घेण्यासही वेळ मिळाला नाही.
