yuva MAharashtra ◆ जतच्या आमदारांना जमते मग, तुम्हाला का जमत नाही? ◆ मिरज सुधार समितीचा आमदार सुरेश खाडेंना जाहीर सवाल

◆ जतच्या आमदारांना जमते मग, तुम्हाला का जमत नाही? ◆ मिरज सुधार समितीचा आमदार सुरेश खाडेंना जाहीर सवाल


 


◆ जतच्या आमदारांना जमते मग, तुम्हाला का जमत नाही?

◆ मिरज सुधार समितीचा आमदार सुरेश खाडेंना जाहीर सवाल  

◆ मिरज रेल्वे जंक्शन, मिरज औद्योगिक वसाहत, मिरज न्यायालय इमारतीसह अन्य प्रश्न प्रलंबित

---------------------------------------------------------------------

जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच, अतिरिक्त जिल्हा न्यायालय मंजूर करून घेतले. तीन वर्षे कॅबिनेटमंत्री आणि वीस वर्षे आमदार असणारे आमदार सुरेश खाडेंना मिरज रेल्वे जंक्शन विकास, मिरज औद्योगिक वसाहतीची झालेली वाताहत, मिरज न्यायालय इमारत, भाजी मंडई आदी विधायक प्रश्न सोडविता आलं नाही. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जमते मग, आमदार सुरेश खाडेंना का जमत नाही? असा खडा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे.


मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी म्हणाले, नैसर्गिक साधनसामुग्रीने परिपुर्ण मिरज शहर आहे. मिरज रेल्वे जंक्शनसह वैद्यकीय, औद्योेगिक व संगीत नगरी म्हणून मिरजेचे नावलौकिक काही वर्षापासून लयास जात आहे. याचा परिणाम शहरासह तालुक्यातील आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.

 अनेक तरूण बेरोजगार होत आहेत. मिरज न्यायालय आणि महात्मा गांधी पोलीस चौकी भाड्याच्या जागेत आहेत.  गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. त्यांच्या सत्तेचा फायदा मिरजेला होईल या प्रामाणिक हेतूने मिरज सुधार समितीने विधानसभा निवडणूक आ. खाडेंना पाठिंबा दिला होता.

 मात्र, तीन वर्षे कॅबिनेटमंत्री आणि वीस वर्षे भाजपचे आमदार असणारे आमदार सुरेश खाडे यांच्याकडून मिरज रेल्वे जंक्शन विकास, मिरजेचे मेडिकल हब आणि  वाताहत झालेल्या मिरज औद्योगिक वसाहत वाचविण्याचा कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही.

रस्तेवर रस्ते चढवून विकासाच्या थापा मारणारे आमदार सुरेश खाडे हे केवळ कॉंग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांना सोबत घेत गंमत-जंमत करण्यातच व्यस्त आहे. आमदार खाडेंनी त्यांच्यापेक्षा अनुभवाने कनिष्ठ असलेले जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून काहीतरी सकारात्मक बोध घ्यावा, असा टोला मिरज सुधार समितीने लगाविला आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे आणि रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते उपस्थित होते.