◆ म्हैसाळ रस्त्यावरील टर्निंग पॉईंटमध्ये सुरू आहे जुगार अड्डा?
◆ पोलिसांची गांधाराची भूमिका
मिरजेतील एका माजी नगरसेविकेच्या जुगारी मुलाने पुन्हा शहरात जुगारी आणि गोवा मेड कॅसिनो खेळाचा डाव मांडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला तीन पानी, रमी तसेच, गोवा पध्दतीचा कॅसिनो खेळ मांडला जात असल्याने मिरज शहरातील तरूणाई कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागत आहे.
यंदा हा खेळ महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या म्हैसाळ रस्त्यावरील टर्निंग पॉईंटमध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या जुगार व गोवा कॅसिनो डाव खेळण्यासाठी व पाहण्यासाठी मिरज शहरासह मिरज पूर्व भागातील तरूणाईंची झुंबड उडाली आहे.
तसेच, टर्निंग पॉईंट हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असल्याने कर्नाटकातील अनेक सराईत गुन्हेगारांचा मुक्काम या ठिकाणी होत असल्याने मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने तरूणाई बरबाद करणाऱ्या म्हैसाळ रस्त्यावरील टर्निंग पॉईंटमध्ये रात्रंदिवस सुरू असलेल्या जुगार व गोवा कॅसिनो डावा सारखे अन्य ठिकाणचे जुगार अड्डे तात्काळ बंद करण्याबाबतचे निवेदन मिरज सुधार समितीने कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगेसह अन्य संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.
याबाबत आठ दिवसांत कारवाई न झाल्यास जेथे जुगार व गोवा कॅसिनो डाव मांंडला आहे, त्याच ठिकाणी धरणे आंदोलनाचा इशाराही मिरज सुधार समितीने दिला आहे. मिरज सुधार समितीने मिरज शहरात व मिरज पूर्व भागात सुरू असलेल्या जुगार व गोवा कॅसिनो खेळाचे ठिकाणाची यादीच पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात दिली आहे.