🟣 रस्ता रुंदीकरण मिरजकरांसाठी मृगजळ ठरणार का...?
🟣 मिरजेतील रस्ता रुंदीकरण "पाहणी"तच अडकले
🟣 तीन आयुक्तांकडून वर्षात पाच वेळा पाहणी
🟣 मिरज सुधार समितीचे सातत्याने पाठपुरावा
मिरज शहरातील केवळ प्रमुख पाच रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बहुतांश सुटणार असल्याने गेल्या पाच वर्षांपासून मिरज सुधार समिती रस्त्यांचे रुंदीकरणासाठी गेल्या पाच वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. एका वर्षांत तीन आयुक्तांनी पाहणी केली. मात्र, रस्ता रुंदीकरण "पाहणी" च्या पुढे सरकत नसल्याचे दिसते.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, राजर्षी शाहू महाराज चौक ते किसान चौक, किसान चौक ते शास्त्री चौक, महात्मा गांधी चौक ते बॉम्बे बेकरी मार्गे, महाराणा प्रताप चौक, अब्दूल करीम खां चौक ते किसान चौक (दर्गा रोड) आणि बॉम्बे बेकरी ते दिंडीवेस (कमान वेस रस्ता) या रस्त्यांचे रुंदीकरण होण्यासाठी मिरज सुधार समिती गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. 2023ला महापालिकेवर प्रशासकराज सुरू झाल्यावर राजकीय दबाव झुगारून प्रशासक रुंदीकरण कामाला गती देईल अशी अपेक्षा होती.
मात्र, महापालिकेत येणारे आयुक्त शहरातील रस्ता रुंदीकरणबाबत उदासीन असल्याने काम रखडले. वर्षभरात सुनील पवार, शुभम गुप्ता आणि आताचे सत्यम गांधी यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी केली. मात्र, रुंदीकरणासाठी मिळकतधारकांची नुकसान भरपाई सह अन्य प्रक्रिया बाबत महापालिका प्रशासनाकडे कोणतेच नियोजन नसल्याने, रस्ता रुंदीकरण हे मिरजकरांसाठी मृगजळ ठरणार का..? अशी टीका मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी आणि अध्यक्ष राकेश तामगावे यांनी केली आहे.