🟣 मिरज रेल्वे जंक्शनला वाऱ्यावर सोडलं का...?
🟣 नियोजन शून्य आणि खाबूगिरीमुळे अवघ्या वर्षभरात पादचारी छताला गळती
🟣 जंक्शनसमोरील तुटलेल्या ड्रेनेजमध्ये वाहनाचे चाक अडकले
🟣 संबंधित बांधकाम रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची रेल्वे प्रवासी संघाची मागणी
मिरज रेल्वे जंक्शनसमोर ड्रेनेजचे झाकण तुटून चारचाकी वाहनांचे चाक ड्रेनेजमध्ये अडकून अपघात घडत आहेत. तर, अवघ्या वर्षभरातच जंक्शनच्या पादचारी पुलाला गळती लागली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील महत्त्वाचे मिरज रेल्वे जंक्शन निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि कामचुकार रेल्वे प्रशासनाने वाऱ्यावर सोडले का...? अशी संतप्त प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
मिरज रेल्वे जंक्शनच्या गेटपासून ते जंक्शन आणि रेल्वे गाड्यांमध्ये सुध्दा रेल्वे प्रवाशांना इतक्या मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत असूनही निष्क्रिय खासदार-आमदार आणि रेल्वे अधिकारी झोपेचे सोंग घेतले असल्याची टीका रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.
तसेच, मिरज रेल्वे जंक्शनवर इतक्या समस्या असूनही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कामचुकार रेल्वे बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे विभागाकडे केली आहे.