♦️ मिरज रेल्वे जंक्शनवर शरावती एक्सप्रेस तीन तास अडकली
♦️ एक्सप्रेसमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात रेल्वे प्रशासनाची हलगर्जी
तिरूनवेली - दादर शरावती एक्सप्रेसमध्ये मिरज रेल्वे जंक्शनवर पाणी भरण्याची व्यवस्था केली नसल्याने शरावती एक्सप्रेस तब्बल तीन तास थांबून राहिली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी मिरज रेल्वे जंक्शन अधीक्षकांना घेराव घालत जाब विचारला. केवळ रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याने या प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.
शनिवारी तिरूनवेली - दादर शरावती एक्सप्रेस मिरज रेल्वे जंक्शनवर सायंकाळी 7.40 वाजता एक तास अगोदर आली. सदर गाडीला मिरज जंक्शनवर पाणी भरण्याची व्यवस्था केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण भारतातून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये पाणी भरण्याबाबत मध्य रेल्वेचे मिरज जंक्शन प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक वेळा अर्धवट पाणी भरून गाडी पुढे मार्गस्थ होत असते. त्यामुळे अनेक वेळा अर्ध्या वाटेतच रेल्वेमध्ये पाणी संपल्याच्या तक्रारी येत आहेत. रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत रेल्वे प्रवासी संघाने आक्रमक भूमिका घेत दक्षिण भारतातून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये पुरेसा पाणी भरण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते यांनी सांगितले.