♦️ हजरत मिरासाहेब दर्गा मैदानाचा व्यवसायिक वापर खेदजनक
♦️ बेकायदेशीर दुकानांमुळे भाविकांचे सुरक्षितता धोक्यात
♦️ प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची होत आहे मागणी
♦️ संवेदनशील विषयातून मार्ग काढण्याचे मिरज सुधार समितीचे प्रशासनाला आवाहन
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या हजरत मिरासाहेब दग्र्याचे महंती फार मोठी आहे. दररोज देशातील विविध प्रांतातील हजारो भाविक दग्र्याला भेट देत असतात. भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. यातील बहुतांश भाविक आपल्या कुटुंबियांसमवेत चारचाकी वाहने घेऊन नवस फेडण्यासाठी येत असतात.
भाविकांची वाहने लावण्यासाठी दर्गा परिसरातील मोहरमखानासमोर मोठे मैदान आहे. मात्र, या मैदानात गेल्या आठ-दहा वर्षापासून दर्गाला लागणाऱ्या पुजाचे साहित्य, विविध प्रकारची खेळणी, खाद्य पदार्थ विक्रीचे दुकाने, चहाच्या टपऱ्यासह स्थानिक दुकानदारांनी आपली जुनी वाहने उभी करून संपुर्ण मैदानावर अतिक्रमण केले आहे.
भाविकांची वाहने लावण्यासाठी कोठेच जागा शिल्लक राहिलेली नाही. काही पुजा साहित्य विक्रेते भाविकांना त्यांची वाहने दुकानासमोर उभी करावयाचे असेल तर, पुजाचे साहित्य चढत्या दराने विकून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याच्या तक्रारी भाविकांतून व्यक्त होत आहेत. जर, कोणी भाविक पुजाचे साहित्य न घेता आपली वाहने उभी करीत असेल तर, विक्रेते त्या भाविकांशी वाद घालतात. अनेकवेळा मारामारीचे प्रकारही घडत असल्याचे चित्र आहे.
दर्गा शेजारील मुसाफीर खाना मैदानातही हीच परिस्थिती आहे. या मुसाफिर खान्यात भाविक जेवण तयार करीत असतात. शिवाय, मुसाफिर खानासमोरील मैदानात शेकडो भाविक बसून प्रसाद घेत असतात. दुर्दैवाने एखाद्या ठिकाणी अप्रिय घटना घडली किंवा आगीची घटना घडली तर, भाविकांना सुरक्षितरित्या बाहेर पडण्यास कोणताच मार्ग उपलब्ध नाही. शिवाय, अग्निशमन दलाच्या गाडीला सुध्दा मुसाफीर खानापर्यंत पोहचण्यास एकही मार्ग नाही. आहे त्या मार्गावर दुकाने थाटून मार्ग बंद करण्यात येत आहे. अशा गैरजबाबदार प्रकारामुळे भाविकांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे.
दुकानदारांनी मैदान परिसरात दुकाने थाटून पुर्ण रस्ताच बंद केला आहे. मात्र, दुकाने थाटत असताना भाविकांना दर्ग्यातून बाहेर पडण्यासाठी कोठेच मोकळी जागा किंवा रस्ता सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे भाविकांना विशेषत: महिला, अबाल वृध्दांना दर्गातून बाहेर पडताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दर्गा व्यवस्थापणाचे कोणाचे पायपुस कोणालाच नाही...
दर्गा कमिटीचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने कोणाचे पायपुस कोणालाच नाही... दर्गा परिसरातील वाहतूक कोंडी पुर्णत: कोलमडली आहे. यातून परप्रांतातून येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, दर्गा मैदान परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांकडून भाविकांशी होणाऱ्या अरेरावीपणामुळे हजरत मिरासाहेबांच्या महंतीला गालबोट लागत असल्याचे खेदाने म्हणावे लागेल. यातून मिरज नगरीचे नावही बदनाम होत असल्याने यात प्रशासनाने लक्ष देऊन दर्गा समोरील बेकायदेशीर व अतिक्रमण केलेली दुकाने काढून टाकण्याची मागणी खादीम जमातीचे काही जागृत सदस्य करू लागले आहेत. हा संवेदनशील विषय असल्याने प्रशासनाने समन्वयाची भुमिका घेत सकारात्मक मार्ग काढावा अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे.