yuva MAharashtra 🟣 रात्रीच्या वेळी रेल्वेच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना त्रास देऊ नका 🟣 रेल्वे प्रवासी संघाची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

🟣 रात्रीच्या वेळी रेल्वेच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना त्रास देऊ नका 🟣 रेल्वे प्रवासी संघाची रेल्वे प्रशासनाकडे मागणी



🟣 रात्रीच्या वेळी रेल्वेच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना त्रास देऊ नका

 🟣 रेल्वे प्रवासी संघाची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

__________________________________

मिरज रेल्वे जंक्शनवर दररोज हजारो रेल्वे प्रवासी विविध प्रांतातून येतात. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या मध्यरात्री उशिरा मिरज रेल्वे जंक्शनवर येतात. त्यामुळे प्रवाशांना गाड्यांची प्रतिक्षा करत रात्री रेल्वे स्थानकावर घालवावी लागते. मात्र, केवळ सुरक्षिततेच्या कारणावरून रात्री सुरक्षा कर्मचारी प्रवाशांना स्थानकातून हाकलून देतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. रात्री व अपरात्री प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

 रेल्वे प्रवासी संघाचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, असिफ निपाणीकर, युवराज मगदूम, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, दिनेश तामगावे, संतोष जेडगे, अभिजीत दाणेकर आदी सदस्यांनी मिरज लोहमार्ग पोलीस निरीक्षक संभाजी काळे आणि रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक महेंद्र पाल यांची भेट घेतली.

 त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  गेल्या काही दिवसांपासून सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करून रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी मिरज जंक्शनच्या फ्लॅटफॉर्मवर रेल्वे गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या रेल्वे प्रवाशांना स्थानकाबाहेर हाकलून देत असल्याचा प्रकार घडत आहे.

 रात्रीच्या वेळी मिरज जंक्शनच्या फ्लॅटफॉर्मवर रेल्वे गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक रेल्वे प्रवाशांकडे रेल्वेचे तिकीट असते. मात्र, सुरक्षा कर्मचारी याबाबत खातरजमा न करता विविध लांब प्रांतातून आलेल्या प्रवाशांना स्थानकाबाहेर हाकलून देण्याचा प्रकार हा अतिशय चुकीचा आणि रेल्वे प्रवाशांच्या हक्क व अधिकाराचा उल्लंघन करणारा आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रेल्वे तिकिटांची खातरजमा करूनच रेल्वे प्रवाश्यांबाबत कारवाई करावी. विनाकारण रेल्वे प्रवाशांना त्रास देऊ नये, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.