🟣आमदार-खासदारांची ही "अंडरस्टॅडींग" "मिरज सुधार" साठी व्हावी...
🟣 मिरज सुधार समितीची माफक अपेक्षा
🟣 मिरजेच्या प्रश्नांसाठी आमदार-खासदारांनी एकाचवेळी केंद्रियमंत्र्यांना भेटावे हा "दुग्धशर्करा" योग
--------------------------------------------------------
मिरज रेल्वे जंक्शन विकास, अर्धवट राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासह अन्य विकास कामांबाबत आमदार सुरेशभाऊ खाडे व खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका होत असतानाच, दोन दिवसांपूर्वी मिरज रेल्वे जंक्शनसह अन्य केंद्राशी निगडीत विषयावर मिरजेचे भाजप आमदार सुरेशभाऊ खाडे व कॉंग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी एकत्रितपणे केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. त्यामुळे मिरज रेल्वे जंक्शन विकासासह अन्य केंद्राशी निगडीत विषय मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मिरज तालुक्यात भाजप आमदार सुरेशभाऊ खाडे आणि कॉग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटील यांची राजकीय ’’अॅडरस्टॅडिंग’’ असल्याचे चर्चा अनेक वेळा होत असते. याचा प्रत्यय मिरजकरांना सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिरजकरांना आला आहे. राजकारण काही असो... आमदार-खासदारांची ही अंडरस्टॅडिंग ’’मिरज सुधार’’ व्हावी, अशी माफक अपेक्षा मिरज सुधार समितीने व्यक्त केली आहे.
१९९८ साली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका अस्तित्वात आल्यापासून महापालिका कारभारावर मिरजेच्या कारभाऱ्यांचे वर्चस्व राहिले आहे. कारभाऱ्यांनी अनेक वेळा शहराचा विकासाचा मुद्दा पुढे करून ’मिरज पॅटर्न’च्या नावाखाली सांगलीकर तसेच इस्लामपूरकरांना चितपट केले आहे. तिन्ही शहरापेक्षाही जास्त निधी मिरज पॅटर्नमुळे शहरात खर्च झाल्याची ओरड सांगली आणि कुपवाड शहरातून होत आहे. मात्र, शहराची अवस्था पाहिल्यास अनेक वर्षापासून शहरातील महत्वाचे प्रश्न लालफितीत खितपत पडले आहेत.
मिरज रेल्वे जंक्शन, संगीताचे माहेरघर आणि वैद्यकीय पंढरी म्हणून शहराचे नाव सातासमुद्रा पलिकडे पोहचलेला आहे. मात्र, कारभाऱ्यांनी गेल्या २० वर्षात शहर विकासासाठी सुमारे दोन हजार कोटीहून अधिक निधी खर्च केल्याचा दावा करतात. मात्र, शहराची अवस्था पाहिल्यास गेल्या वीस वर्षापासून अनेक मूलभूत सुविधापासून मिरजकर वंचित आहेत. त्यामुळे हा निधी नेमका खर्च कोठे झाला? हे सांगण्यासाठी कोणी ज्योतिषाची गरज नाही.
🔹 मिरज रेल्वे जंक्शनकडे अक्षम्य दुर्लक्ष
मिरज रेल्वे जंक्शन हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या देशातील महत्वाच्या राज्यांना जोडणारा रेल्वे जंक्शन आहे. तत्कालीन केंद्रिय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मिरज जंक्शनला मॉडेल स्टेशनची घोषणा केली होती. त्यानंतर मोदी सरकारमध्ये अमृत भारत योजनेच्या पेज-१ आणि पेज-२ मध्ये सुध्दा मिरज जंक्शनचा समावेश केला. मात्र, त्यांची अंमलबजावणीच झाली नाही. म्हणून दक्षिण-पश्चिम रेल्वेचे हुबळी व बेळगांवी रेल्वे स्टेशन प्रमाणे मिरज जंक्शनचा मॉडेल स्टेशन म्हणून विकास करण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याबाबत लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
🔹 कालबाह्य पाणी व ड्रेनेज पाईपलाईन
शहरातील पिण्याच्या पाण्याची आणि ड्रेनेजची पाईप लाईन तत्कालीन मिरज नगरपालिका असताना करण्यात आली आहे. त्याची आयुष्य मर्यादा २५ वर्षापूर्वीच संपली आहे. मात्र, या पाईप लाईनचा वापर आजतागायत होत आहे. त्यामुळे दोन्ही पाईप लाईनला गळती लागून शहरात वारंवार दुषित पाणी पुरवठा होत असतो. याचा परिणाम नागरिकांना गॅस्ट्रो आणि कॉलऱ्या सारख्या जिवघेण्या आजाराला तोंड द्यावे लागते. आजअखेर यावर महापालिकेला तोडगा काढता आला नाही.
🔹 शहरात स्वच्छतेचा बोजवारा...
शहरातील स्वच्छतेचा प्रश्न नगरपालिका असल्यापासून आहे. प्रत्येक चौकातील तुंबलेल्या लोखंडी कचराकुंडी व त्या शेजार कचऱ्यात चरत असलेली जनावरे हे चित्र मिरजकरांसाठी नवे नाही. कचरा उठाव वेळेवर होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. नागरिकांना जीवघेण्या आजारांना तोेंड द्यावे लागत आहे. प्रशासनाकडून अपुरे कर्मचारी असल्याचे सांगितले जाते. मात्र, अनेक आरोग्य कर्मचारी कारभाऱ्यांच्या शेतातील कामे करीत असल्याचेही समोर आले आहे.
🔹 भटकी कुत्री व मोकाट जनारांचा प्रश्न गंभीर...
मिरज शहरात भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात लहान-वृध्दासह आता तरâणही जखमी होत आहेत. शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडे भटक्या कुूत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याबाबत कोणतीच ठोस उपाययोजना नसल्याने नागरिकांमध्ये कुत्र्यांविषयी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय, मोकाट जनावरे रस्त्यावर थांबत असल्याने शहरातील वाहतुक कोंडीत भर पडत आहे. शिवाय, वाहनधारकांचे जीव धोक्यात येत आहे.
🔹 प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण रखडले...
शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूक कोंडी ही शहराच्या विकासाला मारक ठरत आहे. छत्रपती शिवाजी रस्ता, अब्दूल करीम खां चौक (स्टेशन चौक) ते शहर पोलीस ठाणे, छत्रपती शाहू चौक ते शहर पोलीस ठाणे, गांधी चौक ते बॉम्बे बेकरी ते दिंडीवेस (कमानवेस मार्गे), किसान चौक ते शास्त्री चौक शनिवार पेठसह अन्य काही रस्त्यांचे रुंदीकरणाचे विषय प्रलंबित आहे. रुंदीकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने प्रशासनही हतबल आहे. प्रमुख चौक व अरुंद रस्त्यांमुळे उद्भवणाऱ्या वाहतूकीची समस्येचा परिणाम उद्योग उभारणीवरही होत आहे. शहरात रेल्वेसह अन्य दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध असूनही केवळ वाहतूक कोडीच्या समस्यामुळे वाहनधारकांसह उद्योजकही हैराण आहेत.
🔹भाजी मंडईचा प्रश्न खितपत...
मिरज मार्केट परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाला बाजारामुळे वाहतूक कोंडी समस्या बिकट होत आहे. बालगंधर्व नाट्यगृह समोर, गाडवे चौकामध्ये भाजीबाजार भरला जातो. न्यायालयानेही येथे बाजार भरण्यास मनाई केली आहे. पण भाजी मंडई नसल्याने रस्त्यावर बाजार भरविण्याशिवाय पर्याय नसतो. राजकीय साठमारीतून भाजी मंडईचा प्रश्न गेल्या पंचवीस वर्षापासून खितपत पडला आहे.
🔹लक्ष्मी मार्केटसह उद्यानांची दुरावस्था...
शहराच्या ऐतिहासिकतेची साक्ष देणारी लक्ष्मी मार्केटची वास्तू आहे. मात्र, या वास्तूची गेल्या २५ वर्षात डागडुजी झाली नाही. पदाधिकारी व अधिाकारी पुरातन विभागाच्या परवानगीचे कारण सांगून डागडुजीकडे कानाडोळा करीत आहेत. पर्यायाने ही वास्तूच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय शहरातील डॉ. आंबेडकर उद्यान वगळता सर्वच उद्याने बंदावस्थेत आहेत.
🔹 बालगंधर्व नाट्यगृह मोजत आहे शेवटचा घटका...
तत्कालीन महापौर किशोर जामदार यांनी २००५ साली कोट्यावधी रूपये खर्चून शहराला साजेसे नाट्यगृह उभारले. मात्र, नाट्यगृहाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या दहा वर्षातच नाट्यगृह मोडकळीस आले आहे. शिवाय महसूल नियमांचे पालन केले नसल्याने महसूल विभागाची कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
🔹 छत्रपती शिवाजी क्रीडांगणाकडे अक्षम्य दुर्लक्ष...
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रीडांगण हे एकमेव क्रीडांगण आहे. शहरात फुटबॉलची मोठी परंपरा आहे. या क्रीडांगणावर राष्ट्रीय पातळीचे फुटबॉल सामन्याबरोबरच क्रिकेट आणि हॉलीबॉलचे सामने खेळले जातात. पावसाळ्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून क्रीडांगणाला तलावाचे स्वरूप येते. शहरातील जनावरे धुण्यासाठी या पाण्याचा वापर होतो. पावसाळ्यानंतर क्रीडांगणात चिखल होत असल्याने हिवाळ्यात देखील या क्रीडांगणाचा खेळासाठी काहीच उपयोग होत नाही. वर्षाच्या १२ महिन्यांपैकी उन्हाळ्यातील केवळ तीनच महिने या क्रीडांगणाचा वापर होतो. क्रीडांगणात साचणाऱ्या पाण्याबाबत महापालिका किंवा राज्य सरकारचे कोणतेच नियोजन नाही. पाणी निचऱ्याचा नावाखाली सुमारे साडेचार कोटींचा निधी वाया गेला असताना अधिकारी व कारभाऱ्यांना याचे कोणतेच सोयरसुतक नाही.
🔹 छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याकडे जाणीवपुर्वक कानाडोळा
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी २४ कोटींच निधी मंजूर असूनही गेल्या तीन वर्षापासून अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणासाठी काही मिळकताधारकांना द्यावे लागणारे १० कोटी ६५ लाखांची नुकसान भरपाई, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि शहरी बस स्थानकाचे भिंत सरकवणे, रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्याचे दुभाजक आदी कामे होणे आहेत. झालेला रस्ता अत्यंत निकृष्ट असल्याने अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता पुर्णत: उखडला आहे. रस्त्याचे काम अर्धवट असताना संबधित ठेकेदाराला ९० टक्के रक्कम अदा करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या पुर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. रस्त्याच्या पुर्णत्वाकडे आमदार-खासदारांचे का कानाडोळा होत आहे? याचे कोडे अनुत्तरीत आहे.
