🔴 महापालिका आयुक्त मिरजेला का येत नाहीत...?
🔴 मिरज सुधार समितीचे पालकमंत्र्यांकडे सवाल
महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ९ लाखांहून अधिक असताना आयुक्त सत्यम गांधी हे आठवड्यातून केवळ मंगळवार दुपारी ३ ते ६ असे केवळ तीनच तास नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार असल्याने अडचणींंची सोडवणूक कशी होणार? हा संशोधनाचा विषय आहे. सांगली शहराएवढेच मिरजेचे महत्व असताना आयुक्त मिरज विभागीय कार्यालयात का येत नाही? असा सवाल करत आयुक्तांनी किमान आठवड्यातून दोन दिवस मिरजेला येण्याबाबत आयुक्तांना सुचना करण्याची मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
गुरूवारी मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, अभिजीत दाणेकर, रामलिंग गुुगरी, सलीम खतीब, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, झीशान मुश्रीफ, शमशोद्दीन देवगिरी आदी सदस्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मिरज शासकीय विश्रामगृहात भेट घेतली.
मिरजेला पुर्ण वेळ अतिरिक्त आयुक्त, अतिक्रमण हटाव प्रमुख, आरोग्याधिकारी नेमण्याची तसेच, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार मिरजेचा पदभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांना देण्याची मागणी केली. तसेच, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासह अन्य पाच रस्त्यांचे रस्ता रुंदीकरण, भाजी मंडईचे काम पुर्ण करणे, रस्त्यांसाठी येणाऱ्या निधीचा विनियोग होण्यासाठी रोड रजिस्टर ठेवणे, भटक्या कुत्र्यांचे कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हैद्राबादच्या धरतीवर उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
" पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासन आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक लावून प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन मिरज सुधार समितीला दिले असल्याचे अॅड. ए. ए. काझी यांनी सांगितले."
_______________________
बैठक, पाहणी शंभर टक्के मात्र, अंमलबजावणी शुन्य टक्के...
आयुक्त सत्यम गांधी यांनी पदभार स्विकारल्यानंतर महापालिका क्षेत्रातील समस्यांबाबत सुमारे १००हून अधिक प्रशासनाच्या बैठका व अनेक ठिकाणी पाहणी केल्या. मात्र, निर्णयाची अंमलबजावणी शुन्य टक्के. आयुक्तांचा व अन्य अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची टीका मिरज सुधार समितीने केली आहे.

