🔴 "खाकी’’ चे भगवेकरण होऊ नये...
🔴 किमान पोलिसांनी याचे भान ठेवणे अपेक्षित...
-------------------------------------------------
मिरज गणेशोत्सवाची एक अगळीवेगळी परंपरा आहे. गणेशोत्सव मुर्ती तयार करणे, भव्यदिव्य स्वागत कमानी उभी करण्यासह अन्य गणेशोत्सवात लागणारे साहित्य निर्माण करण्यात मुस्लिम बांधवांचा मोठा सक्रिय सहभाग असतो. अनेक गणेशोत्सव मंडळाची धुरा मुस्लिम बांधव यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यामुळे मिरजेतील गणेशोत्सव हा सामाजिक सलोखा जपणारा उत्सव म्हणून नावलौकिक आहे.
अनंत चतुर्थी दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीचे एक ऐतिहासिक महत्व आहे. अनंत चतुर्थीच्या मिरवणुकीत सर्वधर्मिय गणेशभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले असतात. अनंत चतुर्थी दिवशी शेवटची गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यावरून विविध मंडळांमध्ये टोकाचा इर्षा व त्यातून होणारे वाद टाळण्यासाठी शेवटचे गणेश विसर्जन मिरज शहर पोलीस ठाण्याचा गणेश मुर्तीने होऊ लागल्याने मंडळांमधील श्रींचे विसर्जन करण्यावरून होत असलेल्या वादाला पुर्णविराम मिळाला.
दरवर्षी, मिरज शहर पोलीस ठाण्याचे गणेश विसर्जन पारंपारिक वाद्यांच्या गजरात अत्यंत भक्तीभावाने केले जाते. मात्र, यंदाचा मिरज शहर पोलीस ठाण्याचे गणेश विसर्जन विविध कारणांमुळे चर्चेत आले आहे. त्यात सर्वात महत्वाचे कारण डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रबोधन करणारे पोलीस अधिकारीच कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून डॉल्बीच्या तालावर ’’बॉम्बे से आया मेरा दोस्त’’वर ठेका धरत असल्याचे पाहून सर्वसामान्य मिरजकरांचे डोळेच पांढरे झाले. (यापूर्वी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांकडून इतका "उत्साह" दिसला नव्हता.. आताच का...? असाही प्रश्न उपस्थित राहतो आहे)
दुसरे कारण म्हणजे पोलिसांचे ब्रिदवाक्य ’’सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ म्हणजे महाराष्ट्र पोलीस सज्जानांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत... असा होतो.
देशात कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवून देशाचे अखंडपणा जपण्यात पोलिसांचे म्हणजेच ’’खाकी’’ चे अनन्य साधारण महत्व असल्याचे अनेक वेळा अधोरेखित झाले आहे.
मात्र, यंदाच्या अनंत चतुर्थी दिवशी ज्या पध्दतीने मिरज शहर पोलीस ठाण्याचे गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेला पेहराव बरोबरच पोलीस अधिकाऱ्यांकडून गाडीवर थांबून भगवा झेंडा फडकाविण्याचा घडलेला प्रकार पाहता... पोलिसांविषयी दलित व अल्पसंख्यांक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या भारत देशाच्या अखंडतेसाठी निश्चितच चांगले नाही...
भगवा म्हणजे केसरी रंग हा त्यागाचा प्रतिक म्हणून समजला जातो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा झेंडा भगवा म्हणजे केसरी होता. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात भगव्या झेंड्याखाली हिंदू-मुस्लिम मावळे एकत्रित येणे अभिमानाचे मानत असत. मात्र, गेल्या काही वर्षात भगव्या रंगाची व्याख्या बदलल्याने समाजात दुहीचे वातावरण शिगेला पोहचले असताना पोलिसांकडूनच ’’खाकी’’ चे होणारे भगवेकरण... निश्चित सामाजिक एकतेसाठी चिंतेची बाब आहे.
