🟣 15 ऑक्टोबरपासून मिरज-बेळगांव पॅसेंजरचे तिकीट दर कमी होणार
🟣 मिरज सुधार समिती व रेल्वे प्रवासी संघाच्या पाठपुराव्यात सातत्य
दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील या दोन राज्यांमधील दुवा ठरलेल्या मिरज-बेळगांव-मिरज ही स्पेशल गाडी 1 ऑक्टोबर पासून पॅसेंजर म्हणून नियमित धावत आहे. विशेष म्हणजे 15 ऑक्टोबर पासून तिकीट दर पॅसेंंजर गाडीप्रमाणे राहणार असल्याचे दक्षिण-पश्चिम रेल्वेने एका नोटिफिकेशनद्वारे जाहीर केले आहे. मिरज-बेळगांव-मिरज पॅसेंजर नियमित करुन तिकीट दर पॅसेंंजरप्रमाणे होण्यासाठी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण-पश्चिम रेल्वेकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. शिवाय, या पॅसेंजर गाडीला 51461 ते 64 असे क्रमांक असणार आहेत.
15 ऑक्टोबरपासून तिकीट दर कमी होणार...
मिरज-बेळगांव ही सकाळी 9.50 वाजता आणि सायंकाळी 5.35 वाजता सुटते. 15 ऑक्टोबर 2025 पूर्वी या गाडीला उगार,कुडची व रायबाग रेल्वे स्थानकापर्यंंत 45 रूपये तिकीट दर होते. आता हे दर 10 ते 15 रूपये इतके असणार आहे. तर, घटप्रभा, गोकाक रोड, पाचापूर, सुलधाल, सुलेभावी व बेळगांवपर्यंंत 70 रूपये इतके दर होते. आता केवळ 25 रूपयांमध्ये बेळगांवला जाता येणार आहे.
त्यामुळे मिरज-बेळगांव मार्गावरील छोटे व्यापारी, कामगार, विद्यार्थी, नोकरदार वर्गाला दिलासा मिळाल्याची भावना रेल्वे प्रव्रासी संघाचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते़, उपाध्यक्ष वसीम सय्यद, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर यांनी व्यक्त केले आहे.
