yuva MAharashtra 🟣 मिरज-बेळगांव-मिरज पॅसेंंजर आता नियमित 🟣 तिकीट दरही कमी होणार

🟣 मिरज-बेळगांव-मिरज पॅसेंंजर आता नियमित 🟣 तिकीट दरही कमी होणार



🟣 मिरज-बेळगांव-मिरज पॅसेंंजर आता नियमित

🟣 तिकीट दरही कमी होणार

🟣 मिरज सुधार समिती व रेल्वे प्रवासी संघाच्या पाठपुराव्याला यश

दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील या दोन राज्यांमधील दुवा ठरलेल्या मिरज-बेळगांव-मिरज ही स्पेशल गाडीला आता नियमित धावणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या गाडीचे दर एक्सप्रेस गाड्यांच्या दराप्रमाणे होते. मात्र, १ ऑक्टोबर २०२५ पासून या गाडीचे दर पॅसेंंजर गाडीप्रमाणे असणार असल्याने मिरज-बेळगांव मार्गावरील सर्वसामान्य प्रवाशांना लाभ होणार आहे. या मिरज-बेळगांव-मिरज गाडी नियमित करुन तिकीट दर पॅसेंंजरप्रमाणे करण्याची मागणी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने अनेक वेळा मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वेकडे केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे.

 

पाठपुराव्याचा रेटा... 

मिरज-बेळगाव-मिरज पॅसेंजर कोराना काळात बंद करण्यात आली होती. कोरोना संपल्यानंतरही ही पॅसेंजर सुरू करण्यात आली नाही म्हणून मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण-पश्चिम रेल्वे हुबळी प्रादेशिक कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी मिरज-बेळगाव-मिरज स्पेशल एक्सप्रेस म्हणून सुरू करण्यात आली. मात्र, ही गाडी सर्व स्थानकानावर थांबूनही या गाडीचे दर एक्सप्रेस गाडी एवढे असल्याने सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक लूट केली जात होती. म्हणून पुन्हा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण-पश्चिम रेल्वेकडे पाठपुराव्याचा रेटा लावल्याने अखेर 1 ऑक्टोबर 2025 पासून ही गाडी पॅसेंजर म्हणून धावणार आहे. 

तिकीट दर कमी होणार...

मिरज-बेळगांव ही सकाळी ९.५० वाजता आणि सायंकाळी ५.३५ वाजता सुटते. १ ऑक्टोबर २०२५ पूर्वी या गाडीला उगार,कुडची व रायबाग रेल्वे स्थानकापर्यंंत ४५ रूपये तिकीट दर होते. आता हे दर १० ते १५ रूपये इतके असणार आहे. तर, घटप्रभा, गोकाक रोड, पाचापूर, सुलधाल, सुलेभावी व बेळगांवपर्यंंत ७० रूपये इतके दर होते. आता केवळ २५ रूपयांमध्ये बेळगांवला जाता येणार आहे.

त्यामुळे मिरज-बेळगांव मार्गावरील छोटे व्यापारी, कामगार, विद्यार्थी, नोकरदार वर्गाला दिलासा मिळाल्याची भावना रेल्वे प्रव्रासी संघाचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते़, उपाध्यक्ष वसीम सय्यद, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर यांनी व्यक्त  केले आहे.