yuva MAharashtra मिरज रेल्वे जंक्शनचा स्लॅबही ढासळाय लागला

मिरज रेल्वे जंक्शनचा स्लॅबही ढासळाय लागला

 


मिरज रेल्वे जंक्शनचा स्लॅबही ढासळाय लागला

सुस्त प्रशासन व लोकप्रतिनिधी मिरज जंक्शनचा विकास कधी करणार...?
मिरज सुधार समितीचा सवाल




--------------------------------------------------------------------



महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकमेव जंक्शन असूनही मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासाकडे मध्य रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जीर्ण झालेल्या मिरज रेल्वे जंक्शन इमारतीचा स्लॅब ढासळत असतानाही रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गांधाराच्या भुमिकेत आहेत. मिरज जंक्शनच्या विकासासाठी मिरजेत येणाऱ्या रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोरच आंदोलन करावे लागेल, असा इशारा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने दिले आहे.
मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासाच्या अनेक वेळा रेल्वे बजेटमध्ये मिरज जंक्शनच्या विकासाच्या घोषणा झाल्या. तत्कालीन केंद्रिय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या आयडीयल स्टेशनची घोषणा त्यानंतर मोदी सरकारमध्ये अमृत भारत योजनेच्या पेज-१ आणि पेज-२ मध्ये मिरज जंक्शनचा समावेश केला. मात्र, त्यांची अंमलबजावणीच झाली नाही. मध्य रेल्वेच्याच अखत्यारितील कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्याच बरोबर दक्षिण-पश्चिम रेल्वेने बेळगांव, घटप्रभा, रायबाग, कुडची सारख्या छोट्या रेल्वे स्टेशनचा विकास केला. राजकीय नेत्यांची उदासिनता आणि रेल्वे अधिकाऱ्यांची वेळकाढूपणा यामुळे मिरज जंक्शन इतर स्टेशनचा मानाने विकासापासून वंचित राहिला आहे.
मिरज रेल्वे जंक्शनची इमारत जीर्ण झालेली आहे. इमारतीचा अनेक  भाग ढासळत आहे. रविवारी वाऱ्यासह झालेल्या पावसात मिरज रेल्वे जंक्शनचा जीर्ण झालेला दर्शनी भागाचा स्लॅब ढासळून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहे.  मात्र, रेल्वे प्रशासन आणि संसदेत लांब-लांब भाषणे करणारे लोकप्रतिनिधी कुंभकर्ण निद्रात आहे. मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासाकडे मिरजेत येणाऱ्या मध्य रेल्वे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाला अनोख्या पध्दतीने आंदोलन करावे लागेल, असा इशारा मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी यांनी दिला आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद आदी उपस्थित होते.